इचलकरंजीस आरटीओ कार्यालय मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीस आरटीओ कार्यालय मंजूर
इचलकरंजीस आरटीओ कार्यालय मंजूर

इचलकरंजीस आरटीओ कार्यालय मंजूर

sakal_logo
By

इचलकरंजीस आरटीओ कार्यालय मंजूर
आमदार प्रकाश आवाडे; हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील कामकाज चालणार
इचलकरंजी, ता. २३ ः अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर येथे उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय सुरु करण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. या संदर्भातील अध्यादेश आठवडाभरात जारी होऊन १० जूनपर्यंत हे कार्यालय सुरु होईल, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यालयात हातकणंगले व शिरोळ तालुक्याचा कारभार चालणार असून नवीन आरटीओ नोंदणी क्रमांकही मिळणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामुळे इचलकरंजीस जिल्हास्तरीय दर्जा प्राप्त होणार आहे. दरम्यान इचलकरंजी शहरास लवकरच तालुक्याचा दर्जा मिळवण्यास प्रयत्न करणार असल्याचे आमदार आवाडे यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूरनंतर जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून इचलकरंजीची ओळख आहे. शहराचा वाढता विस्तार व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु व्हावे, यासाठी तीन वर्षापासून शासन स्तरावर पाठपुरावा करत होतो. त्यास मंजूरी मिळाली आहे. त्याचबरोबर कार्यालयासाठी आवश्यक ४५ ते ५५ जणांचा स्टाफही उपलब्ध होणार आहे. कार्यालयासाठी गारमेंट प्रशिक्षण केंद्राची सध्या वापरात नसलेली इमारत अत्यंत उपयोगी आहे. ती जागा भाडेतत्वावर उपलब्ध करुन द्यावी यासाठी आपण महापालिका प्रशासनाला पत्रही दिल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.
दरम्यान २८ जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्‍यावर येत आहेत. याचदिवशी मान्यवरांच्याहस्ते तारदाळ येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्‍घाटन करण्याचा मानस असल्याचेही आमदार आवाडे यांनी सांगितले. प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, स्वप्निल आवाडे, डॉ. राहुल आवाडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, महावीर कुरुंदवाडे,सचिन हेरवाडे, नरसिंह पारीक, राहुल घाट, अनिल शिकलगार आदी उपस्थित होते.
--------------
तारदाळमध्ये वाहन पासिंगसाठी ट्रॅक
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण वाहनसंख्येपैकी हातकणंगले व शिरोळ तालुक्यात ४५ टक्के वाहने आहेत. त्यामध्ये रिक्षा, लहान टेम्पो, तीनचाकी टेम्पो प्रकारातील वाहने अधिक आहेत. या वाहनांच्या पासिंगसाठी शहर व परिसरात ट्रॅक उपलब्ध नसल्याने सर्वांना कोल्हापूर येथील आरटीओ कार्यालयात जावे लागते. पासिंग ट्रॅक मोरेवाडी येथे असल्याने तेथे जावून पासिंग करावे लागते. त्यासाठी केएटीपी संस्थेतर्फे तारदाळ येथील संस्थेच्या जागेवर स्वखर्चातून ट्रॅक तयार करुन दिला आहे.