
देशाच्या एकतेसाठी प्रार्थना
18991
-----
देशाच्या एकतेसाठी प्रार्थना
इचलकरंजीसह परिसरात ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण
इचलकरंजी, ता. ३ : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद निमित्ताने मंगळवारी शहरातील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक नमाज पठण केले. मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज पठण करत देशात एकता व अखंडता टिकून रहावी यासाठी प्रार्थना केली. नमाज पठणासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित असल्याने ईदगाह मैदानाबाहेरील मुख्य मार्ग, परिसरही भरून गेला. तब्बल दोन वर्षांनंतर सामूहिक नमाज पठण झाल्याने ईदचा मोठा उत्साह दिसून आला. नमाज अदा करत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम ऐक्याची ईद पहायला मिळाली.
दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. मंगळवारी रमजान ईद साजरी झाली. यंदा प्रथमच रमजान ईदला सामुदायिक नमाज पठण झाले. त्यात राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शहर पोलिस दल नेहमीपेक्षा जास्त सतर्क असल्याचे दिसून येत आहे. शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय अधिकचा होमगार्ड बंदोबस्त आणि शहरावर ड्रोनची करडी नजर आहे.
वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला होता. ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. मैदानच अपुरे पडले. ईदगाह मैदान परिसर तसेच भगतसिंग उद्यान, स्टेशन रोड मुख्य मार्गावर दुतर्फा नमाज पठणासाठी गर्दी झाली होती. हजारो मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी शिरखुरमा पार्ट्या रंगल्या होत्या. आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र यांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शिरखुरम्याचा आनंद लुटला.
-------------
कुरुंदवाडला वृक्षारोपणाचे आवाहन
कुरुंदवाड ः शहर व परिसरात रमजान ईद उत्साही वातावरणात साजरा झाला. ईदगाह मैदानावर मौलवी अरबाज मुफ्ती यांनी नमाज पठण करून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. समाजप्रमुख मीरासाहेब पाथरवट यांनी वार्षिक अहवाल सादर करून समाज बांधवांना वृक्षारोपणासाठी आवाहन केले. समाज प्रमुख पाथरवट यांनी समाज बांधवांना आपापल्या घराच्या परिसरात, शेतात, रस्त्याला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी वृक्षारोपण करून जतन करावे, असा संदेश देत आवाहन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील यांनी शहरात पोलिस बंदोबस्त लावला होता. शहरात नागरिकांना ईदनिमित्त घरगुती वापरासाठी पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने शहराच्या स्वच्छतेबरोबरच शहरात ठिकठिकाणी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी पाण्यासाठी चौकशी करत होते याबद्दल पालिका प्रशासनाचे नागरिकांनी कौतुक केले.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02094 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..