
इचलकरंजीत ९०० वाहन चालकांवर कारवाई
इचलकरंजीत ९०० वाहन चालकांवर कारवाई
एप्रिलअखेर कारवाई; वाहन चालवताना मोबाईल वापरणे पडले महागात
इचलकरंजी, ता. १३ : शहरात वाहन चालविताना मोबाईल वापरणे आतापर्यंत ९०० जणांना महागात पडले. त्यांच्यावर १७ लाख ४६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. एप्रिल अखेरपर्यंतची कारवाई आहे.
शहरातील छोट्या मोठ्या रस्त्यांवर तसेच महामार्गावर चारचाकी, दुचाकी वाहनचालकांकडून वाहन चालवताना मोबाईलचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे एकाग्रता भंग होऊन अपघाताची शक्यता वाढते. परिणामी वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होत आहे. वाहन चालवताना चालक ब्ल्यू टूथद्वारे किंवा कानाला मोबाईल लावून बोलताना आढळत आहेत. दुचाकी वाहनचालक तर बेधडकपणे एका कानाला मोबाईल लावून मान वाकडी करून वाहन चालवताना दिसत आहेत. अशा बेशिस्त वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिलअखेरपर्यंत तब्बल ९०० वाहनचालकांवर कारवाई करुन १७ लाख ४६ हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच नवीन मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहन चालकांचा परवाना तीन महिने निलंबित करण्याबाबत तरतूद केल्याप्रमाणे चालकांचे परवाना तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात येत आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करता सुरक्षितपणे वाहन चालवून आपला व इतरांचा जीव वाचवण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
- - - - - - - -
वाहन चालवताना मोबाईल वापरणे धोकादायक आहे. अशापद्धतीने वाहन चालवणाऱ्या ९०० जणांवर कारवाई केली आहे. तसेच नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार अशा वाहनचालकांचा वाहन परवाना तीन महिन्यासाठी निलंबितही करण्यात येत आहे.
-विकास अडसूळ, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02164 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..