
स्मशानभूमीत दहनविधी बंदिस्त
03590
-----
दहनविधी शेड केले बंदिस्त
इचलकरंजी पंचगंगा नदीघाटावरील स्मशानभूमी; उपद्रवाला बसणार आळा
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १९ : पंचागंगा नदीघाटावरील स्मशानभूमीत आता नवा बदल झाला असून दहनविधी शेड बंदिस्त केला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केलेल्या या बंदिस्त उपाययोजनेमुळे दहनविधीच्या ठिकाणी होणाऱ्या उपद्रवाला आळा बसला आहे. सतरा वर्षे येथे अखंडितपणे सेवा देणाऱ्या चाणक्य अंत्यसंस्कार सेवा संस्थेने सेवाभावी वृत्तीने हे काम केले आहे. यापुढे स्मशानभूमीत सुलभपणे नागरिकांना अंत्यसंस्कार करता येणार आहे.
२००४ मध्ये चाणक्य अंत्यसंस्कार सेवा संस्थेने येथील स्मशानभूमीत सेवा सुरू केली. त्या दिवसापासून शहरातील अंत्यसंस्काराच्या साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी होणारी धडपड थांबली. एकाच छताखाली लागणारे सर्व साहित्य या संस्थेने उपलब्ध करून दिले. यामुळे अंत्यसंस्कारातील समस्या संपल्या असे वाटत असताना काही वर्षांपासून चाणक्य अंत्यसंस्कार सेवा संस्थेला वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. याचा त्रास इतका वाढला की अंत्यसंस्कार अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली. यामुळे कुत्र्यांचा दहनावेळी अडथळा सुरू झाला. दहन झाल्यानंतर राखेची नासधूस आणि रक्षाविसर्जनाला कुत्र्यांच्या उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच राखेतील सोन्या, चांदीचे मौल्यवान दागिने व साधने शोधण्यासाठी अनेकांची गर्दी वाढत गेली. याचा मोठ्या प्रमाणात उपद्रव अत्यंसंस्काराला बाधा ठरू लागला.
अशा समस्यांवर नामी शक्कल लढवत चाणक्य अंत्यसंस्कार सेवा संस्थेने स्मशानभूमीतील दहनविधी ठिकाणच बंदिस्त करायचे ठरवले. सध्या हे ठिकाण सर्व बाजूंनी जाळी आणि लोखंडी बारने बंदिस्त केले आहे. बंदिस्त सुरक्षेमुळे आता दहनविधी शेडला सुरक्षा कवच आले आहे. अंत्यसंस्कार वगळता इतर वेळी भटकी कुत्री यासह अन्य कोणालाही येथे जाता येणार नाही. यामुळे चाणक्य सेवा संस्थेचा त्रास कमी झालाच तसेच अन्य उपद्रवी गोष्टींना आळा बसला आहे. यापुढे स्मशानभूमीत नागरिकांना विना अडथळा अंत्यसंस्कार करता येतील.
- - - - - - - - - - - - - --
तीन स्वच्छतागृहांची उभारणी
चाणक्य सेवा संस्थेने सेवाभावी भावनेतून सुमारे आठ लाखांची कामे केली. दहनविधी शेडच्या बंदिस्त कामासह तीन स्वच्छतागृहे उभारली आहेत. टॉयलेट, बाथरुमसह या स्वच्छतागृहात अंघोळची सुविधा असणार आहे. गरम पाण्यासाठी सोलरही बसवला आहे.
- - - - - - - - -
अंत्यसंस्कार करताना चाणक्य संस्थेला आणि नागरिकांनाही अडचणीचे ठरत होते. दहनविधी शेड आणि स्मशानभूमीत होणारी गैरसोय लक्षात घेवून संस्थेने नवा बदल केला. दहनविधी बंदिस्त झाल्याने कायमस्वरूपी उघडे असणारे हे ठिकाण आता अंत्यसंस्कार आणि रक्षाविसर्जनसाठी खुले असणार आहे.
-नंदकिशोर भुतडा, अध्यक्ष, चाणक्य अंत्यसंस्कार सेवा संस्था
- - - - - -