
गझल माणसं जोडणारा काव्यप्रकार
लोगो ः
मनोरंजन व्याख्यानमाला
-------------------
03618
गझल माणसं जोडणारा काव्यप्रकार
---
प्रदीप निफाडकर; इचलकरंजी व्याख्यानमालेचा समारोप
इचलकरंजी, ता. २२ : आपल्याकडे गझलेने आसेतुहिमाचल माणसांना जोडलेले आहे. कविवर्य सुरेश भट यांच्यामुळे मराठीत गझलेची आणि गझलकारांची एक फळी निर्माण झाली आहे. रसिकांच्या दृष्टीने, गझल त्यांच्या हृदयापर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गझल ही समजून लिहिणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार आणि कवी प्रदीप निफाडकर (पुणे) यांनी केले.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत समारोपाच्या दिवशी ‘गझलदीप’ या विषयावर श्री. निफाडकर बोलत होते. सुरुवातीला त्यांच्या हस्ते शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यतिराज भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. मनोरंजन मंडळाचे कार्यवाह दत्ता टोणपे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. धनंजय सातपुते यांनी प्रास्ताविक केले. संजय होगाडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
‘गझलदीप’ या कार्यक्रमात निफाडकर यांनी अनेक गझला सादर केल्या. गझल या काव्यप्रकाराविषयी त्यांनी परिपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, की ऊर्दू ही एक पूर्णपणे भारतीय भाषा आहे. आणि भारतात गझल ही ऊर्दूमधून सुरू झाली. त्यामुळे सर्व भारतात गझलेचा प्रसार झाला. अनेक राज्यांत गझल पोचली, तसेच मराठीतही ती आली. मराठीत माधव जूलियन यांनी गझलेची सुरुवात केली असली, तरी सुरेश भटांनी गझलेची एक परंपरा निर्माण केली.
गझल या काव्यप्रकाराबद्दल अधिक विवेचन करताना निफाडकर म्हणाले, की गझलेला कवितांची कविता असे म्हणतात. कारण, गझलेतील दोन ओळींच्या प्रत्येक शेरालाही एक अर्थ असतो. कवितेत एकच गोष्ट, एकच कल्पना शेवटपर्यंत असते; तर गझलेत दोन-दोन ओळीत अर्थपूर्ण कल्पना मांडलेली असते.
‘हसण्याची संधी असूनी
ते सारे रडले होते,
मी हसत-हसतच जगलो
मी दुःख पचवले होते’
अशा प्रकारच्या अनेक आशयपूर्ण गझला त्यांनी आपल्या कार्यक्रमात सादर केल्या. या वेळी निफाडकर यांनी गझल लिहिण्यासाठी आवश्यक असलेले वृत्त वगैरे या तांत्रिक बाबी असून, हा अभ्यास फक्त कवींसाठी आहे. रसिकांच्या दृष्टीने, गझल त्यांच्या हृदयापर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गझल ही समजून लिहिणे आवश्यक आहे. जीवनातील सगळे अनुभव आपण मुरवायचे असतात, मग त्याची चांगली कविता होते. त्यामुळे कविता लिहिताना अनावश्यक घाई करू नये, असे त्यांनी सांगितले.
रसिक श्रोत्यांच्या आग्रहास्तव गझलदीप या कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी
‘जगाने उरी जी धरावी गझल,
अशी एक मला सुचावी गझल’
या ओळींनी केला. सहकार्यवाह संतोष आबाळे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02222 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..