
हातकणंगले तालुक्यातील १०४ शाळांचा निकाल १०० टक्के
29890
इचलकरंजी : निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेमध्ये झालेली विद्यार्थ्यांची गर्दी. (पद्माकर खुरपे : सकाळ छायाचित्रसेवा)
हातकणंगले तालुक्यातील
१०४ शाळांचा निकाल १०० टक्के
इचलकरंजी, ता. १७ : बारावी परीक्षेच्या निकालानंतर सुरू असलेली दहावीच्या विद्यार्थ्यांची हुरहूर अखेर संपली. जिल्ह्यात सर्वाधिक परीक्षार्थी असणाऱ्या हातकणंगले तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९८.८७ टक्के लागला. यंदा दहावीची परीक्षा पूर्ववत ऑफलाइन झाल्याने निकालावर काहीसा परिणाम झाला. यंदा तालुक्यातील १०४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला, तर उर्वरित ४४ शाळा १०० टक्के निकालापासून दुरावल्या. निकालानंतर विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये गर्दी केली होती. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ०.८ ने कमी झाली आहे.
यंदा प्रत्यक्ष ऑफलाइन परीक्षा झाल्याने निकालाची उत्सुकता होती. गेल्या वर्षी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर अडथळा निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागली होती. त्यामुळे ही भीती आज दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये निकाल पाहताना दिसली. मात्र कोणताही अडथळा न येता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता आला. सायबर कॅफे, शाळांमध्ये निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी जमले होते. निकाल पाहताच प्रफुल्लित चेहऱ्याने एकमेकांचे गुण विचारात विद्यार्थ्यांनी आंनद साजरा केला.
अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर लागलेल्या गतवर्षीच्या निकालाचा टक्का बहुतांश शाळांना टिकवता आला नाही. कोरोनापूर्वी दहावीची परीक्षा ऑफलाइन होत होती. त्यावेळी १०० टक्के निकाल मिळवताना शाळांना अधिक तयारी करावी लागत असे. यंदा अशीच परीक्षा झाली असून शाळांची गुणवत्ता सुधारली आहे. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९९.३२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत; तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ९८.५० टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा ०.८२ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
---------------
चौकट
हातकणंगले तालुका निकाल
- एकूण शाळा ..........१४८
- नोंदणी केलेले विद्यार्थी........११ हजार ७३४
- परीक्षेला बसलेले विद्यार्थी........११ हजार ७०३
- उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.......११ हजार ५७१
- विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण........५ हजार ८३१
- प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.......३ हजार ८७८
- द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण........१ हजार ६४३
- उत्तीर्ण ........२१९
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02361 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..