
झेरॉक्स व्यवसाय अडचणीत
03902
संग्रहित
----------
झेरॉक्स व्यवसाय अडचणीत
पेपर, टोनर, लाईट बिलात वाढ; व्यावसायिकांना महागाईच्या झळा
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २० : झेरॉक्ससाठी लागणारा पेपर, टोनर यांच्या किमती वाढल्या आहेत. लाईट बिलामध्येही मोठी वाढ झाली आहे. वीस वर्षांत शहरात महागाई वेगात वाढत गेली; पण झेरॉक्सचे दर फारसे वाढले नाहीत. आता मात्र महागाईच्या झळा झेरॉक्स व्यावसायिकांना तीव्रपणे सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे झेरॉक्स व्यवसाय अडचणीत आला आहे.
इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. झेरॉक्स व्यवसायासाठी लागणारा पेपर, टोनर (शाई) यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. व्यवसायातील प्रचंड स्पर्धेमुळे ग्राहकांना झेरॉक्स अल्पशा दरात दिली जाते. त्यामुळे झेरॉक्स व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागतो. मागील वीस वर्षांच्या वाढत्या महागाईचा विचार करता १० अथवा २० पैशांत झेरॉक्सचे दर वाढले आहेत; पण झेरॉक्ससाठी लागणारा कागद, टोनर, विजेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ती वाढ सध्या झेरॉक्स दराला असह्य होत आहे. यासह कामगारांचा पगार, दुकान भाडे, सर्व्हिस चार्ज, कर, इंटरनेट देखभाल याचाही ताण आहे. झेरॉक्स मशिनच्या किमती लाखात आहेत. अशा परिस्थितीतून झेरॉक्सचा व्यवसाय शहरात सुरू आहे. त्यामुळे स्वयंरोजगार व उदरनिर्वाहाचे साधन असलेली अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आली आहेत.
शहरात लहानमोठे ५० हून अधिक झेरॉक्स व्यावसायिक आहेत. दररोज झेरॉक्सची मोठी उलाढाल शहरात होते. जिल्हा न्यायालय, पुरवठा कार्यालये, अप्पर तहसील, प्रांत कार्यालय, नगर भूमापन, नगरपालिका, बँका असे मोठे जाळे असल्याने झेरॉक्सला मागणी आहे. वरिष्ठ, अभियांत्रिकी यांसह शाळांची संख्या अधिक असल्याने विद्यार्थ्यांची मागणी कायम आहे. मागणी असताना दुसरीकडे झेरॉक्स व्यवसाय आता आर्थिक कचाट्यातून मार्गक्रमण करत आहे. यावर्षी याच्या झळा झेरॉक्स व्यावसायिकांना बसताना दिसत आहे. गेल्या वीस वर्षांत झेरॉक्स पेपरचे दर ३५ टक्क्यांनी, तर शाईचे दर ८० टक्क्यांनी वाढले आहेत.
- - - - - - - - - - - - -
वाढती महागाई आणि झेरॉक्स दर
वर्ष * झेरॉक्स पेपर * टोनर (प्रतिकिलो) * वीज (प्रतियुनिट)* झेरॉक्स दर
- - -
१९९७* ६५-७०* ५०-७०* २.२५*५० पैसे
२०१७*१२५-१५०* ५००-७००* ७.३०* ६० पैसे
२०१८ * १५०-१७०* ६३०* ८.३०* ८० पैसे
२०२२* १८०-२००* ८३०* ८.३०* ८० पैसे /१ रुपया.
- - - - -- - -
झेरॉक्ससाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भांडवल अधिक झाले असून झेरॉक्स दर मात्र कमी आहेत. आता वाढत्या महागाईत सध्याचे दर व्यावसायकीयांना परवडणारे नाहीत. झेरॉक्स दर आता प्रतिपेज दोन रुपये झाल्यास परवडू शकते.
-सीताराम हवालदार, झेरॉक्स व्यावसायिक.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02376 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..