
दोन घरफोड्या
चंदूरमध्ये ४० हजारांच्या
दागिन्यांची चोरी
तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न
इचलकरंजी, ता. १० : चंदूर (ता. हातकणंगले) येथे शनिवारी (ता. ९) मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत एक बंद घर फोडले. या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ४० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून केले. या घटनेची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, चंदूर येथील अकमान मळ्यात राहणारे प्रवीण पाटील अमरनाथ यात्रेला गेले आहेत. २८ जूनपासून त्यांचे घर बंद आहे. चोरीच्या भीतीने भाऊ प्रकाश पाटील त्यांच्या घराकडे लक्ष ठेवून होते. मात्र, आज पहाटे त्यांच्या घराचे दार उघड असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रकाश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पाहणी केली. यावेळी घराचे कुलूप तोडल्याचे आणि शयनकक्षात साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले.
प्रकाश पाटील यांनी प्रवीण यांच्याकडून माहिती घेतली आणि सोन्याची कर्णफुले, चांदीचे आरती सेट, कमरपट्टा, छल्ला, ताट, समई, लक्ष्मीचा मुखवटा असा सुमारे ४० हजारांचा ऐवज लंपास झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान, गावात सराफ दुकान, फार्म हाऊससह एका बंद घरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. त्यामुळे चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.
यंत्रमाग कारखाना फोडला
कारखाना बंद असल्याचा फायदा उठवत चोरट्याने कुलूप तोडून चोरी केली. कारखान्यात प्रवेश करून कॉटनयार्डची दोन सुताची बाचकी लांबवली. एकूण ३४ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे. याची फिर्याद सूरज सुधाकर कुडचे यांनी पोलिसांत दिली. ही घटना शुक्रवारी (ता. ८) मध्यरात्री वंदे मातरम ग्राऊंडजवळ वेदांत हाईटस् अपार्टमेंटनजीक घडली. कुडचे यांनी कारखान्यात कॉटनयार्डची पाच सुताची बाचकी आणली होती. त्यातील दोन शिल्लक राहिली होती. शुक्रवारी रात्रपाळीला कारखाना बंद होता. ही संधी साधून चोरट्याने शिल्लक दोन बाचक्यावर डल्ला मारला.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02479 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..