
नवरात्रोत्सवाचा आजपासून जागर
04626
-------------
नवरात्रोत्सवाचा आजपासून जागर
इचलकरंजीत आदिशक्तीच्या स्वागताची तयारी पूर्ण
इचलकरंजी, ता. २५ : भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम असणाऱ्या नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. निर्बंधमुक्त होणाऱ्या आदिशक्तीच्या स्वागताची तयारी शहरात पूर्ण झाली आहे. सुमारे १५० हून अधिक सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव मंडळांनीही तयारी पूर्ण केली आहे. या चैतन्यदायी नवरात्रोत्सवाला उद्यापासून (ता. २६) प्रारंभ होत आहे. घरोघरी विधीवत घटस्थापना होऊन आदिशक्तीची आराधना केली जाणार आहे. गरबा दांडिया खरेदीसाठी आणि नवरंगाच्या विशेष आकर्षणातून कापड मार्केटमध्येही उलाढाल वाढल्याने व्यापारी व्यस्त झाला आहे. घटाचे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी झाल्याने चैतन्य पसरले होते. देवी आदिशक्तीच्या जागराचे यावर्षी नऊ दिवस खूप उत्साहाने आणि मांगल्याने भरलेले असणार आहेत.
मांगल्याचे प्रतिक असलेल्या नवरात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत असून दोन वर्षांपासून करोनामुळे हा सण म्हणावा तितका उत्साहाने साजरा झाला नव्हता.यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे नवरात्र उत्सवाचे उत्साही वातावरण मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. घटस्थापनेसाठी शाहु पुतळा परिसर, मलाबादे चौक ते गांधी पुतळा, डेक्कन चौक, राजवाडा चौक परिसरात घटाची माती, घट, नाडापुडी इतर साहित्य खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. घरगुती आणि सार्वजनिक उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून देवीच्या उपासनांची पूर्वतयारी करण्यासाठी महिलांची धांदल उडाली आहे. सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव मंडळांनी मंडप उभारणी अंतिम टप्प्यात आणली आहे. देवीची मूर्ती पारंपरिक पद्धतीने नेण्यासाठी पारंपारिक कुंभारवाड्यामध्ये गर्दी सुरू झाली होती. तसेच नऊ दिवस दुर्गामातेची नवरुपांमध्ये पूजा बांधली जाते. देवीला साडी चोळी, ओटी, खण नारळ, रांगोळी, वस्त्र यांसह पूजा साहित्य खरेदीसाठी गडबड वाढली. नऊ दिवस उपवास असल्याने खजूर, भाजणीचे पीठ, साबुदाणा, शेंगदाणे याशिवाय ड्रायफ्रूट इत्यादी फराळाच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
----------------
नवरंगाशी साजेशी खरेदी
नऊ दिवसाचा रास, गरबा, दांडिया इत्यादीच्या खेळासाठी वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या बांधणीच्या साड्या हव्या असल्याने महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. नवरात्र संवाद, नवरंगांचे महिलांमध्ये विशेष आकर्षण आहे. नऊ दिवस नऊ रंगांच्या साडया परिधान केल्या जातात. त्यामुळे कापड दुकाने सज्ज झाली. नवरात्र सुरू होण्यापूर्वी नवरंगातील साड्या, ड्रेस खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.