पंचगंगा परिक्रमा शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा परिक्रमा शुभारंभ
पंचगंगा परिक्रमा शुभारंभ

पंचगंगा परिक्रमा शुभारंभ

sakal_logo
By

B04713
इचलकरंजी : ‘जलबिरादरी’च्या नदी संवाद परिक्रमेचा येथे पंचगंगा नदीघाटावरील कलशपूजन कार्यक्रमप्रसंगी प्रशासक सुधाकर देशमुख, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, संदीप चोडणकर आदी.

निर्मल नदीसाठी चळवळ उभारावी लागेल

प्रशासक सुधाकर देशमुख ; इचलकरंजीत नदी संवाद परिक्रमेचा प्रारंभ

इचलकरंजी, ता. १५ : नदीमध्ये निर्माल्य, मूर्ती, प्लास्टिक विसर्जन झाल्यामुळे इतर प्रदूषणापेक्षा अल्पप्रदूषण होते, याचे दाखले देत आपणच आपले समर्थन करतो. हे अल्पघातक घटक, द्रव्येसुद्धा जलचरांसाठी घातकच ठरतात. प्रत्येकाने घरापासून सुरुवात केली तर नदी स्वस्थ राहील. यासाठी मोठी चळवळ उभारावी लागेल. ‘नदी समजावून घेऊया’ या जलबिरादरीच्या कार्यक्रमातून समाज नदीशी जोडला जाईल, असा विश्र्वास आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी केले.
डॉ. अब्दुल कलाम जयंतीचे औचित्य साधून आज १०३ नदीखोऱ्यांमधून नदी संवाद परिक्रमेस प्रारंभ झाला. जिल्ह्यातील पंचगंगा नदीखोऱ्यातील नदी संवाद परिक्रमेचा पंचगंगा नदीघाटावर कलश पूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी गजानन महाजन गुरुजी, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अनिल डाळ्या, प्रा आर. एस. पाटील, उमेश पाटील, डॉ. संतोष उमराणे, विश्वास बालीघाटे, जुगल जैन, सुषमा तौर, राजाराम बारागडे, वैभव भोसले, अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या जलबिरादरीबरोबर पहिल्या टप्यात ७५ नद्यांचा अभ्यास, सर्वेक्षण होईल. पंचगंगा नदीखोऱ्याची जबाबदारी पर्यावरण अभ्यासक संदीप चोडणकर यांनी स्वीकारली आहे. पंचगंगा नदी संवाद परिक्रमेचे समन्वयक संदीप चोडणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदूषण, शोषण आणि जलवायू परिवर्तनातून नदीवर आस्मानी आणि सुलतानी संकटे येत आहेत. उद्योग, नगरपंचायती आणि लोकांनी नदीच्या अमृतवहिनीच्या संकल्पसिद्धिसाठी प्रयत्न करावेत, असे मत श्री. चोडणकर यांनी व्यक्त केले. आमदार आवाडे यांनी, नदीला अमृतवाहिनी करण्याच्या कार्यात राजकारणविरहित सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले. माजी आमदार श्री. हाळवणकरांसह पर्यावरणप्रेमींनी मनोगत व्यक्त केले.
------------------------
चौकट
अशी असेल परिक्रमा
*जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली समिती
*सरकारी अधिकारी व पर्यावरण मित्रांची टीम
*नदीकाठच्या गावांतील सद्यस्थितीचे संकलन
* नदी निर्मलसाठी प्रत्यक्ष आराखडा
*लोकसहभागातून डिसेंबरनंतर आराखड्याची अंमलबजावणी