उद्‍घाटनापूर्वीच विरंगुळा केंद्र मोडकळीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्‍घाटनापूर्वीच विरंगुळा केंद्र मोडकळीस
उद्‍घाटनापूर्वीच विरंगुळा केंद्र मोडकळीस

उद्‍घाटनापूर्वीच विरंगुळा केंद्र मोडकळीस

sakal_logo
By

04879
इचलकरंजी : १) विरंगुळा केंद्राच्या पत्र्याच्या शेड मोडकळलेल्या अवस्थेत आहेत.
04880
२) विरंगुळा केंद्राचे बांधकाम उंचीवर झाले असून चढण्यासाठी अशा भल्या मोठ्या पायऱ्या आहेत.
-----------------
उद्‍घाटनापूर्वीच विरंगुळा केंद्र मोडकळीस
इचलकरंजीत महापालिकेकडून सुंदर बागेत उभारणी
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : कोणी विरंगुळा केंद्रासाठी जागा देता का हो ! अशी हाक दिल्यावर उभारण्यात येत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची अवस्था सध्या फार बिकट आहे. विरंगुळा केंद्र सुरू होण्याआधीच ते मोडकळीस येत आहे. वाकलेले व कापलेले पत्रे, मोडकळीस आलेले लोखंडी अँगल याची दुरवस्था झाली आहे. पत्र्याचे शेड कधी कोसळेल हे सांगता येत नाही. झालेली दुरवस्था व ज्येष्ठांसाठी अडचणीच्या ठरलेल्या रचनात्मक बांधणीमुळे सुंदर बागेतील या विरंगुळा केंद्राचे भविष्य धोक्यात आले आहे.
दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून, ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या वाढत आहे. सध्या शहरी जीवन धावपळीचे आणि यंत्रमय झाले आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांकडून ज्येष्ठांची विचारपूस, देखभाल, पोषण, आरोग्य व आवश्यक त्या प्राथमिक सुविधा गरजा याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ज्येष्ठांना गैरसोयीच्या ठिकाणी दिवसाचा बराच वेळ घालवावा लागत आहे. त्यामुळे दीड वर्षापूर्वी ज्येष्ठ नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढत विरंगुळा केंद्र उभारण्याची मागणी केली. तत्कालीन नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी यासाठी जिल्हा नगरोत्थान योजनेतून १० लाख मंजूर केले. काही महिन्यांपासून सुंदर बागेतील अडगळीच्या जागेचा वापर या ठिकाणी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून विरंगुळा केंद्राच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. धीम्या गतीने याचे बांधकाम सुरू असून उद्‍घाटन होण्याआधीच विरंगुळा केंद्र मोडकळीस येत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
पत्र्याच्या शेड तिन्ही बाजूला मोडलेल्या आहेत.
कुठे वाकलेले, कुठे फाटलेले, तर काही ठिकाणी पत्रे लोखंडी अँगलसकट कधी खाली पडतील हे सांगता येत नाही. शेडमध्ये लोखंडी अँगल तर अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. बांधकामाला तर गतीच नाही आणि दिवसेंदिवस शेडची दुरवस्था होतच आहे. विरंगुळा केंद्राचे बांधकाम करताना ज्येष्ठ नागरिकांचा महापालिकेने विचारच केला नसल्याचे वास्तव आहे. लांबलचक पायऱ्या आणि अति उंचीवर उभारलेले शेड ज्येष्ठ नागरिकांसाठी अजिबात बरोबर नाही. याबाबत तक्रारी केल्यानंतर महापालिका जागे होऊन आता यामध्ये बदल करणार आहे. प्रलंबित बांधकाम गतीने करून एक मजबूत विरंगुळा केंद्र लवकर सेवेत आणावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांतून होत आहे.
-------------------
झाडांची केली कत्तलच
निसर्ग संपन्नतेने बहरलेल्या सुंदर बागेत विरंगुळा केंद्र हे मोठे आकर्षण आहे; मात्र महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे बांधकामाच्या आड येणाऱ्या झाडांची कत्तल झाली आहे. शेड पूर्ण झाल्यावर झाड कापले आणि दिखाव्यासाठी वरचा पत्रा कापला. तसेच बाजूचे एक झाडही असेच कापले आहे.
-------------
कोट
सध्या विरंगुळा केंद्राचे बांधकाम थांबले आहे. मोडकळीस आलेली संपूर्ण दुरुस्ती करून उर्वरित बांधकाम येत्या काही दिवसांत पूर्ण केले जाईल. तसेच योग्य पद्धतीने उभारणी करून ज्येष्ठांसाठी अडथळा ठरणाऱ्या अतिरिक्त झालेल्या पायऱ्या कमी केल्या जातील.
-संजय बागडे, बांधकाम अभियंता, महापालिका.