ग्रामबाल संरक्षण समित्या कागदावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामबाल संरक्षण समित्या कागदावरच
ग्रामबाल संरक्षण समित्या कागदावरच

ग्रामबाल संरक्षण समित्या कागदावरच

sakal_logo
By

संग्रहित छायाचित्र- बालविवाह
ग्रामबाल संरक्षण समित्या कागदावरच
अनेक गावात अस्तित्वच नाही; बालविवाह रोखण्यासाठी सक्रियता हवी
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २८ : समजात पोलिस आणि बालविकास प्रकल्प विभागाच्या दक्षतेमुळे बालविवाह रोखले जात आहेत. वाढणारे बालविवाह थांबवण्यात यश येत असेल तरी बालविवाहाची कुप्रथा आजही कायम असल्याचे दिसत आहे. आता बालविवाह घडूच नये यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. त्यासाठी गावोगावी असणाऱ्या ग्रामबाल संरक्षण समित्या केवळ कागदावर न राहता त्या सक्रिय होण्याची गरज आहे. शिवाय काही गावात अद्याप स्थापन न झालेल्या समित्यांची बांधणी करण्याची गरज आहे.
सध्या शहर व परिसरात बालविवाहाचे गुन्हे सर्रासपणे पोलिसांत दाखल होताना दिसतात. बालविवाहातील अल्पवयीन मुली या सर्वाधिक ग्रामीण भागातील असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिकण्याच्या, खेळण्याच्या वयात मुलींचे बेधडकपणे विवाह लावले जात आहेत. विवाह होवून अनेक दिवस उलटल्यानंतर बालविवाह झाल्याच्या घटना समोर येवू लागल्या आहेत. चार आठ दिवस गेले की एकतरी बालविवाहाबाबत घटनेची नोंद पोलिस ठाण्यात होत आहे. बालविवाहांच्या घटनांना जबाबदार ठरत आहे ती म्हणजे प्रत्येक गावातील बाल संरक्षण समिती. या समितीच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागात बालविवाहाची प्रवृत्ती वाढत आहे.
ग्रामीण पातळीवरच असे बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवक, बालविकास अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या ग्रामबाल समितीत ११ सदस्य असतात. त्यांच्या माध्यमातून असे बालविवाह रोखण्यात येतात. तसेच संबंधित कुटुंबाचे समुदेशन केले जाते. मात्र, जर कुटुंब ऐकत नसेल, तर ही समिती थेट पोलिसांची मदत घेऊ शकते. अशा प्रकरणात संबंधित दोषींवर अटकेची कारवाई देखील होऊ शकते. यात दोन वर्षांची सक्तमजुरी आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र तरी देखील अशी समिती ग्रामीण भागात अजिबात काम करताना दिसत नाही. दिसली तर ती समिती केवळ कागदावरच आहे. ग्रामीण भागातील बालविवाहाचे प्रमाण पाहता बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडूनच ग्रामसेवकांना समिती स्थापन करण्याबाबत दक्ष केले जात आहे. अल्पवयीन मुलीचा बालविवाहासाठी केवळ पालकच जबाबदार नाहीत, तर त्या गावातील ग्रामसेवक, सरपंच देखील आता तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी या समितीने कायद्याचा वचक निर्माण करण्याबरोबरच बालविवाहाच्या दुष्परिणामांवर समाजात जनजागृती करायला हवी.
--------------
चौकट
ग्रामसेवकांसह समितीने काम करावे
ग्रामबाल संरक्षण समितीत सरपंच, पोलिस पाटील, आशा सेविका, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सामाजिक प्रतिनिधी, किशोरवयीन मुलगा व मुलगी, अंगणवाडी सेविका यांचा समिती सदस्य म्हणून सहभाग असतो. तर ग्रामसेवक हे त्या गावचे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतात. या सर्व घटकांनी आपली जबाबदारी विसरल्याने बालविवाहाला खत पाणी मिळत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील काळात ग्रामसेवकासह या समितीने काम करण्याची गरज आहे.
--------
कोट
बालविवाहाची घटना घडल्यास पोलिस व बालविकास प्रकल्प हेच घटक यामध्ये प्रामुख्याने दिसतात. मात्र खरी जबाबदारी असणारी ग्रामबाल संरक्षण समिती यापासून दूर राहते. गावागावात या समितीने सक्रिय झाल्यास बालविवाह रोखण्यात मोठी मदत होणार आहे.
- सुजाता शिंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी, हातकणंगले