एक्झॉटिक भाज्यांची हायटेक रोपवाटिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक्झॉटिक भाज्यांची हायटेक रोपवाटिका
एक्झॉटिक भाज्यांची हायटेक रोपवाटिका

एक्झॉटिक भाज्यांची हायटेक रोपवाटिका

sakal_logo
By

05076
कोंडिंग्रे : नांद्रे यांच्या रोपवाटिकेला नाशिक येथील महिला बचत गटाच्या महिलांनी आवर्जून भेट देऊन माहिती घेत आहेत.

एक्झॉटिक भाज्यांची हायटेक रोपवाटिका
कोंडिंग्रेतील शेतकऱ्याकडून उभारणी; उत्पन्नाची नवी वाट
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ८ : शेतकऱ्यांसाठी शेती हाच मोठा आर्थिक उन्नतीचा स्त्रोत आहे, असे ठामपणे सांगणाऱ्या कोंडिंग्रे (ता. शिरोळ) येथील राजकुमार नांद्रे या शेतकऱ्याने उत्पन्नाची नवी वाट शोधली आहे. त्यांनी एक्झॉटिक भाज्यांची हायटेक रोपवाटिका उभारली आहे. यामुळे रोपांसाठी लांबचा प्रवास थांबला असून, जवळपास जिल्ह्यासह आसपासच्या शेतकऱ्यांची सोय झाली आहे.
शेतीतील पालेभाज्यांचा बदलता ट्रेंड आणि असणारी मागणी लक्षात घेता आठ वर्षे त्यांनी सातत्याने संशोधन आणि प्रयत्न करत आपल्या मातीत एक्झॉटिक भाज्यांच्या रोपवाटिकेचा प्रयोग यशस्वी केला आहे. एक्झॉटिक शेतीत ब्रँड तयार केला आणि शेतीतील उत्पन्न तब्बल चारपटीने वाढवले. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक एक्झॉटिक भाजीपाला शेतीचा झपाट्याने प्रसार शिरोळ, हातकणंगले पट्ट्यात झाला आहे; मात्र मूळ एक्झॉटिक भाजीपाल्यांची रोपे मिळवताना अडचणी येत होत्या. परजिल्ह्यात काही मोजक्याच ठिकाणी असणारी रोपे अनेकवेळा मिळत नसत. त्यामुळे त्यांनी यावर संशोधन व अभ्यास केला. कोंडिग्रेसारख्या छोट्याशा गावात हा प्रयोग यशस्वी करत एक्झॉटिक भाजीपाल्यांची रोपवाटिका उभी केली आहे.
एक्झॉटिक भाजीपाल्याच्या रोपवाटिकेत सध्या नांद्रे हे १५ पेक्षा जास्त विविध प्रजातींच्या भाजीपाल्यांची रोपे तयार करत आहेत. चायना कॅबेज, रेड कॅबेज, झुकीनी,आईस बर्ग, पार्शली, रोमन, ब्रुकली, बेसिन, चेरी टोमॅटो, थाय चिली, कॅप्सीकम, सिम्सन, रेड लोलो अशा विविध जातींच्या भाजीपाल्यांची रोपे त्यांच्या रोपवाटिकेत तयार होत आहेत. यामुळे आता भाजीपाल्याच्या शेतीला बळ मिळाले आहे. बारा महिने उत्पादन मिळणाऱ्या भाजीपाल्यातून शेतकऱ्यांची भरभराट होत आहे.
--------

दहावीत पास पण, शेतीत खास
नांद्रे यांची जेमतेम दहावी शाळा झाली आहे. सुरुवातीपासून त्यांनी शेतीत रस घेतला. काही वर्षांपासून त्यांनी शेतीत खासीयत तयार केली आहे. आठ वर्षांपासून त्यांनी एक्झॉटिक भाजीपाल्यावर लक्ष केंद्रित केले. सध्या त्यांनी एक्झॉटिक भाजीपाल्याच्या उत्पादनासह रोपवाटिका व्यवसायातही भरारी घेतली आहे.
----------
05075
लोकांच्या खाण्यापिण्याची आवड बदलत असून, शेतकऱ्यांनी पिके घेताना बदल अवलंबला पाहिजे. पारंपरिक भाजीपाल्याची जागा एक्झॉटिक भाजीपाला घेत आहे. हा बदल स्वीकारून एक्झॉटिकचे उत्पादन घेतले आणि रोपवाटिकाही सुरू केली आहे. याचा फायदा एक्झॉटिक भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांना होत आहे.
-राजकुमार नांद्रे, प्रगतिशील शेतकरी