कचऱ्याच्या कोंडाळ्यात रेशनकार्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचऱ्याच्या कोंडाळ्यात रेशनकार्ड
कचऱ्याच्या कोंडाळ्यात रेशनकार्ड

कचऱ्याच्या कोंडाळ्यात रेशनकार्ड

sakal_logo
By

कचऱ्याच्या कोंडाळ्यात रेशनकार्ड
इचलकरंजीतील रुग्गे मळा परिसरात स्वच्छता करताना निदर्शनास
इचलकरंजी, ता. ११ : चक्क कचऱ्याच्या कोंडावळ्यात रेशनकार्डांचा ढीगच ढीग सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.येथील रूग्गे मळा भागात हनुमान मंदिर परिसराची स्वच्छता करताना ही बाब निदर्शनास आली.
स्वच्छ्ता करणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर संबधित रेशनदुकानदार या ठिकाणी पोहोचला. आणि पुढील काही क्षणात हा फोटो सोशल मीडियावरून पुसूनही टाकला. मात्र कचऱ्यात आढळून आलेल्या शेकडो रेशनकार्डांमुळे येथील पुरवठा विभागाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे शहरातील मंदिर परिसरात स्वच्छ्ता मोहीम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. आज त्यांची स्वच्छ्ता मोहीम विवेकानंद कॉलनीनजीक रूग्गे मळा भागातील हनुमान मंदिर परिसरात नियोजित होती. त्यानुसार सर्व कार्यकर्ते स्वच्छ्ता करत होते. वाढलेले तण, झाडे झुडपे हटवताना त्यांना प्लास्टिक, बाटल्या आदी कचरा आढळून येत होता. यासोबत तेथे कार्यकर्त्यांना विस्कटलेल्या रेशनकार्डांचा पसरलेला ढीग दिसला. ढिगात नवे जुने रेशनकार्ड जीर्ण अवस्थेत होते. शेकडोंच्या घरात असणारी ही रेशनकार्ड पाहून अवाक झालेल्या कार्यकर्त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. हे पाहून मंदिराच्या ठिकाणी भागातील एक रेशनदुकानदार तत्काळ हजर झाला.
कचऱ्यातील रेशनकार्ड माझ्या दुकानातील आहेत. २०१४ मध्ये शेकडो लाभार्थ्यांचे नूतनीकरण केले होते. त्यावेळी जुनी रेशनकार्ड परत घेतली. कुटुंबातील सदस्यांनी ही रेशनकार्डे कचऱ्यात फेकून दिल्याचे त्या रेशनदुकानदाराने सांगितले. त्यानंतर त्याने कोंडावळ्यातील रेशनकार्ड एकत्र करून घेवून गेला आणि सोशलमीडियावर फोटोही पुसून टाकला. रेशन दुकानात केवळ धान्य वाटपाचे काम केले जाते. या प्रकारानंतर पुरवठा विभागाचे शहरातील रेशनदुकानांवर नियंत्रण नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
-------
रेशनकार्ड बनावट ?
पुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार रेशनकार्डातील त्रुटी सुधारून नूतनीकरण करणे ही कामे सेतू केंद्रात केली जातात. त्यानंतर जुने कार्ड पुरवठा विभाग जमा करून घेतो आणि संबंधित लाभार्थ्याला नवीन रेशनकार्ड दिले जाते. मात्र एखाद्या रेशनदुकानदाराकडे जुनी रेशनकार्ड असणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे उघड्यावर रेशकार्ड फेकणे हा प्रकार म्हणजे बनावट रेशनकार्ड असण्याची शक्यता आहे.
---
कचऱ्यात शेकडो रेशनकार्ड फेकून देणे हा प्रकार गैर आहे. ज्या भागात हा प्रकार घडला आहे, त्या भागातील सर्व रेशनदुकानदारांची सखोल चौकशी केली जाईल. रेशनकार्ड बनावट असतील तर संबंधित रेशनदुकानदारावर कारवाई अटळ आहे.
-अमित डोंगरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी