
पथनाट्यात विवेकानंद कॉलेज विजेते
05138
इचलकरंजी : युवा स्पंदन लघुनाटिका स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारा पेठनाका येथील व्यंकटेश्वरा कॉलेज ऑफ सायन्सचा संघ.
पथनाट्यात विवेकानंद कॉलेज विजेते
युवा स्पंदन स्पर्धा; लघुनाटिकेमध्ये पेठनाका येथील ‘व्यंकटेश्वरा’ प्रथम
इचलकरंजी, ता. १३ : राज्यस्तरीय युवा स्पंदन स्पर्धा उपक्रमाच्या समारोपाच्या दिवशी आविष्कार-पथनाट्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विवेकानंद कॉलेजने (कोल्हापूर) मिळविले. लघुनाटिका स्पर्धेतील प्रथम क्रमांक व्यंकटेश्वरा कॉलेज ऑफ सायन्स (पेठनाका) या संघाने मिळविला. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलतर्फे स्पर्धेचे आयोजन केले होते.
पथनाट्य स्पर्धेत सहभाग घेतलेल्या संघांनी अंधश्रद्धा, राष्ट्रीय एकात्मता, विषमता, भ्रष्टाचार आदी विषयांवर परखड भाष्य करणारी, प्रबोधनपर पथनाट्ये सादर केली. स्पर्धेत डी. आर. के. कॉलेजने (कोल्हापूर) द्वितीय क्रमांक मिळवला. दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने (इचलकरंजी) तृतीय क्रमांक मिळवला. आनंदी बी फार्मसी कॉलेज (कळंबा) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. लघुनाटिका स्पर्धेतील द्वितीय क्रमांक परिसस्पर्श (कराड) यांनी प्राप्त केला. तृतीय क्रमांक डी. आर. के. कॉलेज (कोल्हापूर) यांनी मिळविला, तर श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महविद्यालय (इचलकरंजी) संघास उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.
स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून रंगकर्मी यशोधन गडकरी (सांगली), संजय सातपुते (इचलकरंजी) आणि प्रा. पी. डी. गावडे (चंदगड) यांनी जबाबदारी पार पाडली. परीक्षक यांसह ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मिलिंद दांडेकर, संजय होगाडे, अशोक बोरगांवकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी परीक्षकांनी मार्गदर्शन केले. रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष अशोक जैन, समीर गोवंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा समन्वयक संतोष आबाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन त्रिंबक दातार, राजू सोलगे, अक्षय कांबळे, खुशी भांगडिया यांनी केले. स्पर्धांना रसिकांचा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, कराड, इस्लामपूर या भागातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.