प्लास्टीक संकलन, पुनर्वापर लोकचळवळ बनावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टीक संकलन, पुनर्वापर लोकचळवळ बनावी
प्लास्टीक संकलन, पुनर्वापर लोकचळवळ बनावी

प्लास्टीक संकलन, पुनर्वापर लोकचळवळ बनावी

sakal_logo
By

05187
इचलकरंजी : अमृतवाहिनी नदी संकल्प परिक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलनप्रसंगी विनोद बोधनकर, प्रदीप ठेंगल, प्रसाद कुलकर्णी आदी.
------------
प्लास्टिक संकलन, पुनर्वापर लोकचळवळ बनावी
विनोद बोधनकर; ‘चला नदीला जाणूया’ उपक्रमात मार्गदर्शन
इचलकरंजी, ता. २२ : वापरलेल्या प्लास्टिकचे संकलन आणि त्याचा योग्य पुनर्वापर ही लोकचळवळ बनली पाहिजे. आज प्लास्टिकच्या थरांनी केवळ आपला भूभाग, त्यावरील वने, जंगले, दऱ्याखोरी नव्हे, तर समुद्रही व्यापलेला आहे. आपल्याला मिळणारा ऑक्सिजन आता प्लास्टिकमुळे कमालीच्या वेगाने कमी होत चालला आहे. हा धोका टाळण्यासाठी नव्या पिढीने प्रदूषण मुक्तीच्या लढ्यात सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ विनोद बोधनकर (पुणे) यांनी केले. अध्यक्षस्थानी उपायुक्त प्रदीप ठेंगल होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत पंच्याहत्तर नद्यांना अमृतवाहिनी बनवण्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ‘चला नदीला जाणूया’ या उपक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. इचलकरंजी महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या जिल्हा अमृतवाहिनी नदी संकल्प परिक्रमा संयोजन समितीच्या पुढाकाराने आरोग्य कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक, सामाजिक संस्था यांच्यासाठी पंचगंगा नदीपरिक्रमा, अमृतवाहिनी संकल्प, प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापर या विषयावरील हा प्रबोधनात्मक कार्यक्रम दोन सत्रांत झाला.
दुसऱ्या सत्रात श्री. बोधनकर यांनी ‘प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापर’ या विषयावर स्लाईड शोच्या माध्यमातून मांडणी केली. सागरमित्र या संकल्पनेवर त्यांनी सविस्तर भाष्य केले. प्रास्ताविक पंचगंगा नदी संवाद परिक्रमेचे समन्वयक पर्यावरणतज्ज्ञ संदीप चोडणकर यांनी केले. स्वागत कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी केले. आरोग्याधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी आभार मानले. सहाय्यक आयुक्त केतन गुजर, स्वच्छतादूत महाजन गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
-------
ंपंचगंगेला अमृतवाहिनी बनवावे
पहिल्या सत्रात ‘चला नदी जाणून घेऊया’ या विषयावर बोलताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले, ‘नदी जाणून घेणे याचा अर्थ तिची आजची प्रदूषणकारी विषारी अवस्था बदलून तिला खरीखुरी अमृतवाहिनी बनवणे हा आहे. आपल्या गावातून वाहणाऱ्या नदीचे पाणी पिऊ शकत नाही हे येथील जनतेचे मोठे दुःख आहे. आता पुनश्च हरी ओम म्हणत आपण पंचगंगेला अमृतवाहिनी बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’