
पोलिस बंदोबस्त
इचलकरंजीत आज जनआक्रोश मोर्चा
इचलकरंजी, ता. २४ : लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू व्हावा, यासाठी समस्त हिंदू समाजातर्फे उद्या (ता. २५) जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शाहू पुतळा ते गांधी पुतळा या मोर्चा मार्गावर ६०० हून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे २५० जवान आणि दोन स्ट्रायकिंग फोर्स असा बंदोबस्त राहणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी याबाबत आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. प्रमुख मार्गांवरून मोर्चा निघाल्यावर त्याची सांगता महात्मा गांधी चौकात होईल. अप्पर पोलिस अधीक्षक नीकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, शाहू पुतळा ते गांधी पुतळा चौक मुख्य मार्गाला जोडणारे मार्ग बंद करण्यात येतील. वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी या मार्गाने होणारी वाहतूक शहरात पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.