
सतीश मगदूम यांचा सत्कार
05343
इचलकरंजी : आदिनाथ बँकेच्या बोर्ड सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सतीश मगदूम यांचा सत्कार करण्यात आला.
सतीश मगदूम यांचा सत्कार
इचलकरंजी : सतीश मगदूम यांची आदिनाथ बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे त्यांचा सत्कार केला. प्रगतिशील शेतकरी, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. आण्णासाहेब शहापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष बसगोंडा बिरादार, सदाशिव पाटील, विष्णुपंत साळुंखे, बाळासाहेब पाटील, महादेव शिरगुरे, रामा शेळके आदी उपस्थित होते.
-------
05342
इचलकरंजी: पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती देताना विकास अडसूळ.
विद्यार्थ्यांनी घेतली वाहतूक नियमांची माहिती
इचलकरंजी : पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथे सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबद्दल विविध चित्ररूपी पोस्टर्सद्वारे माहिती दिली. ई-चलन मशिन कसे काम करते, त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईवेळी ब्रेथ अनालायझर मशिनचे कार्य याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम व कामकाज याबाबत प्रश्न विचारले असता त्यांना वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ यांनी उत्तरे दिली.
-----
पंचगंगेतील गाळ काढण्याची मागणी
इचलकरंजी : पंचगंगा पात्रातील गाळ काढावा व नदी प्रदूषित करणाऱ्या संबंधित घटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महानगरपालिकेचे पर्यावरणदूत राजू नदाफ यांनी केली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. २००५ पासून पंचगंगेच्या महापुरामुळे इचलकरंजी शहराचे जनजीवन विस्कळीत होत आहे. पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे नुकसान होते. पंचगंगा नदीपात्रातील गाळ उपसा करून नदी पात्र खोल व रुंद केल्यावर बऱ्याच प्रमाणात नदी प्रवाहित राहून पुराचा धोका टळू शकतो. पावसाळ्यापूर्वी आतापासूनच योग्य ते नियोजन केल्यावर पुराचा धोका टळेल. तसेच नदी प्रदूषित होणे रोखून नदी प्रदूषित करणाऱ्या संबंधित घटकांवर कठोर कारवाई करावी, असे नदाफ यांनी निवेदनात म्हटले आहे.
---------
सन्मानधन योजनेत सहभागाचे आवाहन
इचलकरंजी : घरेलू कामगारांना आता सन्मानधन योजना २०२२ अंतर्गत दहा हजार रुपये लागू झाले आहेत. ही रक्कम ५५ वर्षे पूर्ण केलेल्या नोंदीत व सलग जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून दिली जाणार आहे. आर्थिक साहाय्य देण्याबाबतचे अर्ज आणि याबाबतची माहिती घरेलू कामगारांना देण्यासाठी श्रमिक संघटना कार्यालयात सुविधा केली आहे. हे अर्ज भरून या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन सुनील बारवाडे, धोंडीबा कुंभार यांनी केले आहे.
-----
जिझस स्कूलची शैक्षणिक भेट
इचलकरंजी: येथील जिझस इंग्लिश मीडियम स्कूलने पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त शिवाजीनगर पोलिस स्टेशनला शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलिस स्टेशनबद्दल माहिती दिली. अश्विन डुणुंग यांनी पोलिस स्टेशनमधील दैंनदिन कामकाजाची माहिती दिली. महेश पवार व विजय मिथुन म्हाळुंगेकर यांनी बंदूक, रायफल यांची माहिती सांगितली. पोलिस उपनिरीक्षक सौ. ऊर्मिला खोत यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. सौ. रोहिणी जाधव यांनी ठाणे अंमलदार कक्षाची, तर सौ. रंजना कोरवी व सौ. सोनाली पाटील यांनी कार्यप्रणालीची, प्रशांत ओतारी व सौ. रेखा पाटील यांनी पोलिस कस्टडी विभागाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
-------