
मुलींनी राष्ट्र विकासाला चालना द्यावी
मुलींनी राष्ट्र विकासाला चालना द्यावी
डॉ. डी. सी. कांबळे; डीकेएएससी महाविद्यालयात प्रशिक्षणवर्ग
इचलकरंजी, ता. ३१ : स्त्रियांनी रोजगाराची अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. विविध कौशल्यांच्या बळावर मुलींनी वर्चस्व सिद्ध करत स्वावलंबनाबरोबरच राष्ट्र विकासाला चालना दिली पाहिजे, असे मत उपप्राचार्य डॉ. डी. सी. कांबळे यांनी व्यक्त केले.
येथील डीकेएएससी महाविद्यालयातील इंग्रजी विभागाने आयोजित केलेल्या रोजगार वृद्धी आणि युवा आजीविका प्रशिक्षणवर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण आणि मुलींसाठी रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित व्हावी, या उद्देशाने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. पदवीच्या अंतिम वर्षांमधील मुलींसाठी ४० तासांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नांदी फाउंडेशनच्या महिंद्रा प्राइड क्लासरूम प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या या प्रशिक्षणामध्ये ८० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. महिंद्रा प्राइड क्लासरूमच्या प्रशिक्षिका आसावरी कुलकर्णी यांनी भाषिक कौशल्यांबरोबरच इतर कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत, असे सांगितले. प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनीता वेल्हाळ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. दीपक देवकर यांनी करून दिला. प्रा. डॉ. प्रभा पाटील यांनी आभार मानले. प्रा. संदीप हरगाणे, प्रा. श्रद्धा बरगाले, प्रा. केशर धरनगुत्ते, प्रा. संजय सुतार आदी उपस्थित होते.