
प्रथम फुलपाखरू नोंद
05570
कडगाव : मेनका हे दुर्मिळ फुलपाखरू जिल्ह्यात प्रथमच आढळले.
कडगावमध्ये आढळले दुर्मिळ मेनका फुलपाखरू
प्रमोद कुंभार यांची नोंद; जैवविविधता पुन्हा अधोरेखित
इचलकरंजी, ता. ७ : महाराष्ट्रात दुर्मिळ असणारे दुर्मिळ फुलपाखरू कडगाव (ता. भुदरगड) मध्ये आढळले. त्याचे शास्त्रीय नाव पेंटेड काँट्रीसन व युरीपस कास्नीमिलीस असून मराठी नाव मेनका आहे. याची नोंद निसर्गमित्र शिक्षक प्रमोद कुंभार (अब्दुललाट) यांनी केली. या नोंदीवरून जैवविविधतेच्या दृष्टीने जिल्ह्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.
भुदरगड सह्याद्रीच्या पश्चिम घाटात येणारा, जैवविविधतेने संपन्न प्रदेश. अनेक प्राणी, पक्षी, कीटक येथे आढळतात. येथे मेनका या दुर्मिळ प्रजातीच्या फुलपाखराची नोंद जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री. कुंभार यांनी केली. प्राण्यांच्या कीटक वर्गातील कुंचलापाद या कुळामध्ये मेनका फुलपाखराचा समावेश आहे. या प्रजातीच्या अळीची खाद्य वनस्पती खरगोळ, कापशी आदी वृक्ष आहेत. फुलपाखराचा पंख विस्तार ६० ते ८० मिमी आहे. नर व मादी दोन्हीवर काळे व पांढरे पट्टे असतात. नर व मादी फुलपाखरू यांच्यात फरक असतो. नरामध्ये पंखाखाली व वरील बाजूस लाल ठिपके असतात. जे मादीमध्ये नसतात. मध्यम ते जास्त पावसाच्या घनदाट जंगलात, जास्त उंचीच्या डोंगरावर तसेच समुद्र किनाऱ्यालगत या फुलपाखराचा वावर अधिक असतो. या प्रजातीच्या अगदी कमी नोंदी महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम घाटात झाल्या आहेत.
---------
चौकट
फोटोसह प्रथमच नोंद
मेनका फुलपाखराची राज्यात केवळ नोंद आहे. मात्र, त्याच्या छायाचित्राची नोंद कोठेही नाही. कुंभार यांनी फोटोसह या फुलपाखराची नोंद जिल्ह्यात सर्वप्रथम केली आहे.
----
कोट
05569
फुलपाखरे ही जैवसंवेदके असून त्यांच्यातील विविधतेवरून वनस्पती विविधतेचा अंदाज येतो. जिथे वनस्पतींची विविधता अधिक तिथे प्राणी, कीटकांची विविधता अधिक असते. अशा दुर्मिळ प्रजातीचे संवर्धनासाठी पश्चिम घाटातील वनस्पती विविधता जपणे गरजेचे आहे.
प्रमोद कुंभार, निसर्गमित्र शिक्षक.
----------