
बारावी परीक्षा आजपासून
संग्रहित
बारावी परीक्षा आजपासून
इचलकरंजीत दहा केंद्रांवर तयारी; ८ हजार ७६३ विद्यार्थी
इचलकरंजी, ता. २० : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा मंगळवारपासून (ता. २१) पासून सुरू होत आहेत. परीक्षेची तयारी प्रमुख १० परीक्षा केंद्रांवर सोमवारी सायंकाळपर्यंत सुरू होती.
कस्टडीत प्रश्नपत्रिकेवर पोलिसांची नजर असणार आहे. शिक्षण मंडळाने परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. इचलकरंजी विभागातून १० केंद्रांवर कला, वाणिज्य, शास्त्र आणि किमान कौशल्य शाखेचे एकूण ८ हजार ७६३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोरोनानंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहेत. यंदा परीक्षा केंद्रे म्हणून दहा उच्च माध्यमिक, तसेच कनिष्ठ महाविद्यालये निश्चित केली आहेत. तालुका शिक्षण मंडळ कार्यालयातून परिरक्षक कार्यालयातून (कस्टडी) प्रश्नपत्रिका पोहोचवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावर्षी काही नवीन बदलांसह विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. कोरोनानंतर ऑनलाईन शिक्षणात अनेक विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव कमी झाला. हे लक्षात घेऊन शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी तीन तीन वेळा सराव परीक्षा घेतल्या आहेत. यंदा शिक्षण मंडळासह कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल, पोलिस यांसह इतर विभागांचीही नजर असणार आहे. परीक्षेतील प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वितरणाचे जीपीएस ट्रॅकिंग होणार आहे. सहायक परिरक्षकावर त्याची जबाबदारी असणार आहे. याद्वारे परिरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका केव्हा स्वीकारली, परीक्षा केंद्रांवर केव्हा प्रश्नपत्रिका पोहोचल्या याचे ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा कक्षात प्रश्नपत्रिकांचे पाकीट दिल्यानंतरही छायाचित्रण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
----------
असे नवीन बदल
*प्रश्नपत्रिकेचे परीक्षा कक्षात वाटप निर्धारित वेळेत
*निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे अधिक कालावधी
*सकाळी १०.३० व दुपारी २.३० नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाही
*परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही
*परीक्षा केंद्रावर कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश
*परीक्षा केंद्रांवर बैठी पथके
*कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल, ग्रामविकास विभागाची पथके
------
शिक्षकांना ‘नो’ स्मार्ट वॉच
कॉपीमुक्त परीक्षेसाठी शालेय मंडळाने नेटके नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना यंदा परीक्षाविना काहीच असे साहित्य घेऊन परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला जाणार आहे. तसेच शिक्षकांनाही काही नियम बंधनकारक केले आहेत. साध्या घड्याळाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे स्मार्ट वॉच घालण्यासाठी परवानगी नसेल.