
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इचलकरंजीत मोर्चा
05656
इचलकरंजी : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पहिल्या दिवशी शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढला.
-----------
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इचलकरंजीत मोर्चा
आमदार प्रकाश आवाडे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या, निदर्शने
इचलकरंजी, ता. २१ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागण्यांसह शहरातील ५५० अंगणवाडी कर्मचारी कालपासून (ता. २०) बेमुदत संपावर गेले आहेत. दरम्यान, आज संपाच्या दुसऱ्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्ष कार्यालयावर मोर्चा काढला. आमदार उपस्थित नसल्याने कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत ठिय्या मारला.
राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली नाही, यासह त्यांना वेतनश्रेणी, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन लागू करावी, पोषण आहार ट्रॅकर हे ॲप मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावे, अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी कृती समितीचा एक भाग असलेल्या कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्ष कार्यालयावर निघालेल्या मोर्चाला अण्णा रामगोंडा पाटील शाळेपासून सुरुवात झाली. मोर्चा शिवतीर्थपासून मुख्य मार्गे गांधी पुतळा चौकाला वळसा घालून ताराराणी पक्ष कार्यालयावर थडकला. मोर्चात सहभागी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी भर उन्हात राज्य शासनाचा निषेध करत घोषणाबाजी केली. मानधन नको, वेतन द्या, यासह विविध घोषणा देत ताराराणी पक्ष कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली.
निवेदन स्वीकारण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे उपस्थित नसल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली. मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमदार आवाडे यांनी भागीदारी करावी व विधानसभेत याबाबत आवाज उठवावा, अशी मागणी केली. कर्मचाऱ्यांनी काही काळ कार्यालयासमोर ठिय्या मारला. चर्चा करून समजूत काढल्यानंतर मागणीचे निवेदन ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांना दिले. आंदोलनात सुनील बारवाडे, ज्योती हजारे, उमा तारळेकर, कविता कांबळे, पुष्पलता जाधव, उज्ज्वला तोडकर, सारिका कोकणे, सविता बडवे, सुशीला आवळे आदी उपस्थित होते.