
झाडे जळून नुकसान
05699
जांभळी : ऑक्सिजन पार्क परिसरात अचानक लागलेली आग.
...
जांभळीतील आगीत ६०० झाडे होरपळली
ऑक्सिजन पार्क परिसरात अचानक आग
इचलकरंजी, ता. २६ : जांभळी (ता. शिरोळ) येथील ऑक्सिजन पार्क परिसरात अचानक आग लागली. यात पाच ते सहा फूट उंचीची सुमारे ६०० झाडे होरपळली. इतकेच नव्हे, तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रिप पाईप व इतर साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीमुळे येथील वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले. ही झाडे कुणी लावली, याचा मात्र उलगडा झालेला नाही. घटनेची माहिती शिरोळ पोलिसांनी घेतली आहे.
पूर्वी ओसाड असलेल्या फोंड्या माळरानावर काही सुजाण तरुणांनी एकत्र येऊन आम्ही जांभळीकर फाउंडेशनची स्थापना केली आणि श्रमदान करून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली. तरुणांनी इतक्यावरच थांबून न जाता त्या रोपट्यांचे संगोपनही केले. एकूण, १२ एकर परिसरात १०७ प्रकारची सुमारे चार हजार ५०० झाडे लावली आहेत. झाडांमुळे जैवविविधता वाढून एकूण ३३ फुलपाखरांची नोंद झाली आहे. परिणामी, ‘ऑक्सिजन पार्क’ अशीच नवी ओळख मिळाली. याच ऑक्सिजन पार्क परिसरात अनेक जण सकाळी फिरायला येत असून, आज दुपारच्या सुमारास अचानक याच परिसरात आग लागली. ऑक्सिजन पार्क परिसरात आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आम्ही जांभळीकर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यांनीही तातडीने घटनास्थळ गाठून घटनेची माहिती इतरांना दिली. घटनास्थळी पोचलेल्या कार्यकर्त्यांनी आग रोखण्याचा प्रयत्न करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले; पण तोपर्यंत मोठ्या प्रमाणात वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.
पार्कमधील सुमारे चार एकर परिसर आगीत सापडला. भर उन्हात आगीच्या झळांनी सुमारे ६०० झाडे होरपळली. या भागातील पाण्याच्या सोयीसाठी जोडलेल्या ड्रीप पाईपसह इतर साहित्य खाक झाले. होरपळलेल्या झाडांचा जीव वाचविण्यासाठी तरुणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पार्कमधील आगीची गेल्या दोन महिन्यांतील यंदाची दुसरी घटना आहे. या परिसरात रात्रीच्या सुमारास दारू शौकिनांचा अड्डा असतो. याबाबत पोलिस प्रशासनातील अधिकारी कारवाई करण्याकडे पाठ फिरवत असून, ग्रामपंचायतही दुर्लक्ष करीत आहे.