
बालनाट्यांचे उत्साही, आशयपूर्ण सादरीकरण
05704
इचलकरंजी : मराठी दिन महोत्सवात दुसऱ्या दिवशी आजरा हायस्कूलने ‘वारी’ हे बालनाट्य सादर केले.
----------------------
बालनाट्यांचे उत्साही, आशयपूर्ण सादरीकरण
रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मराठी दिन महोत्सव उपक्रमाचा दुसरा दिवस
इचलकरंजी, ता. २७ : मराठी दिन महोत्सव उपक्रमात दुसऱ्या दिवशी, हेच का ते बालपण देवा? आणि वारी ही दोन बालनाट्य सादर झाली. बालनाट्यांचे उत्साही आणि तितकेच आशयपूर्ण असे सादरीकरण रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविणारे ठरले. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन केले आहे.
आजरा मल्टीस्टेट सहकारी बँकेचे संचालक किशोर भुसारी आणि रोटरीचे माजी सहाय्यक प्रांतपाल मनीष मुनोत यांच्याहस्ते कुसुमाग्रज व नटराज प्रतिमापूजन केले. व्यासपीठावर सौ. सुमन तुषार सुलतानपूरे, विजय पोतदार, दीपक बिडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बालनाट्य कार्यक्रमात सुरुवातीला रुद्रांश ॲकॅडमी, कोल्हापूर प्रस्तुत हेच का ते बालपण देवा? हे बालनाट्य सादर केले. अगदी छोट्या पाच सहा वर्षाच्या मुला मुलींपासूनच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक नाटक सादर केले. एका सहलीमधून परत येणारी बस पंक्चर होते आणि तेथे राहणाऱ्या ग्रामीण मुला-मुलींबरोबर बसमधील शहरी मुला मुलींच्या गप्पा टप्पा होतात. या संवादामधूनच मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा यशस्वी प्रयत्न या बालनाट्यात केला. येथील राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवला होता.
दुसरे बालनाट्य आजरा हायस्कूल, आजरा या संस्थेने सादर केले. ''वारी'' या बालनाट्याने सर्वच प्रेक्षकांची दाद मिळवली. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीबाबत एका विद्यार्थ्याचा गैरसमज असतो. त्याच्या शिक्षिका आणि त्याचे मित्र पुन्हा त्याच्यासहित वारीला जातात, वारी अनुभवतात. त्यावेळी कशाप्रकारे चांगला अनुभव त्यांना येतो याचे दर्शन या बालनाट्याने घडवले. देव, विठ्ठल हा केवळ मूर्तीमध्ये नाही तर तो माणसात आहे, सेवाभावात आहे असा छान संदेश या बालनाट्याने दिला. या नाटकाची निर्मिती मुख्याध्यापक शिवाजी येसणे यांनी केली.
बालरसिक विद्यार्थ्यांबरोबर मोठ्या रसिकांनीही आवर्जून पहावीत अशी ही दोन्ही बालनाट्ये येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सादर करण्यात आली. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि रसिक प्रेक्षकांची चांगली उपस्थिती होती. मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी स्वागत केले. नाट्य परिषदेचे संचालक प्रा. मिलिंद दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कपिल पिसे यांनी सूत्रसंचालन केले.