
तारदाळ उपसरपंचांच्या पतीवर खुनी हल्ला
तारदाळ उपसरपंचांच्या
पतीवर खुनी हल्ला
तिघांकडून घरात घुसून धारदार शस्त्राने वार
तारदाळ, ता. ३ : येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यावर घरात घुसून तिघांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात विनोद कोराणे (रा. तारदाळ) गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यात, छाती व पाठीवर धारधार शस्त्राने वार करून अज्ञात तिघे पसार झाले. खुनी हल्ला जमिनीच्या आर्थिक वादातून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याबाबत शहापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः कोराणे ग्रामपंचायतचे माजी सदस्य असून, त्यांची पत्नी सध्या उपसरपंच आहेत. ते रात्री आठच्या सुमारास घरी कुटुंबातील सदस्यांसमवेत जेवायला बसले होते. यावेळी अचानक तिघे जण धारदार शस्त्रासह घरात घुसले. थेट कोराणे यांच्या अंगावर धावून शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. डोक्यावर, छाती व पाठीवर सपासप वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. जखमी कोराणे यांचा आरडाओरडा ऐकून नागरिकांची गर्दी होताच हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. खुनी हल्ल्यातून कोराणे बचावले असून, हल्लेखोरांची ओळख पटली आहेत. चौकशी करून त्यांना ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहापूर पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद झाली आहे.