
इचलकरंजीत मोपेडच्या डिक्कीतून सव्वा लाखाची रोकड लांबवली
इचलकरंजीत मोपेडच्या डिक्कीतून
सव्वा लाखाची रोकड लांबवली
अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद; गुन्हा दाखल
इचलकरंजी, ता.२४ : येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या दारातून मोपेडच्या डिक्कीत ठेवलेली एक लाख २० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. सीसीटीव्ही असतानाही राणीबाग उद्यानासमोरील या गजबजलेल्या मार्गावर चोरट्याने पाळत ठेवून ही धाडसी चोरी केली. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी जावेद मकसूद खान (वय २९, रा. बंडगर माळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः शहरातील राणी बागेसमोर असणाऱ्या एका बँकेच्या एटीएममधून जावेद यांनी आज दुपारी पैसे काढले. ती रक्कम मोपेडच्या डिक्कीत ठेवली आणि एटीएममध्येच कार्ड विसरल्याने ते आणण्यासाठी गेले. नेमकी हीच संधी साधून चोरट्याने मोपेडच्या डिक्कीतून एक लाख २० हजारांची रोकड लांबवली. याबाबतची माहिती खान यांनी बँकेच्या प्रशासनासह शिवाजीनगर पोलिसांना दिली. सीसीटीव्हीची पाहणी केली असता टोपी घातलेली व्यक्ती मोपेडच्या डिक्कीतील रक्कम घेऊन गेल्याचे दिसून आले. त्यानुसार शिवाजीनगर पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.
...................