
इचलकरंजी येथे उद्यापासून कामगार युनियन संवाद यात्रा
इचलकरंजी येथे उद्यापासून
कामगार युनियन संवाद यात्रा
१५ एप्रिलला परिषद; संघटना एकवटल्या
इचलकरंजी, ता. २५ : वस्त्रोद्योगातील सर्व घटकांच्या हक्क आणि अस्तित्वासाठी कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून यंत्रमाग कामगारांना किमान वेतन, कायद्याचे संरक्षण, कल्याणकारी मंडळ आदी मागण्यांसाठी ‘कामगार युनियन संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. ही यात्रा २७ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत निघणार असून १५ एप्रिलला यंत्रमाग कामगारांची परिषद आयोजित केल्याची माहिती कामगार नेते भरमा कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
कामगार नेते शामराव कुलकर्णी म्हणाले, ‘‘२०१३ च्या करारानुसार महागाई भत्त्यानुसार वेतन वाढवणे हे बंधनकारक होते; मात्र सध्याचे कामगारमंत्री, कामगार अधिकारी हा करारच बेकायदेशीर असल्याचे सांगत आहेत. यंत्रमाग कामगारांना किमान वेतन कायदा लागू असतानादेखील त्यांना किमान वेतन दिले जात नाही. कायद्याचे संरक्षण असून फायदा मिळत नाही. त्यामुळे वाढत्या महागाईत कामगारांच्या कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे कामगारांची कुटुंबे असुरक्षित बनली आहेत. याविरोधात कामगार युनियन संवाद यात्रेतून लढा उभारत कामगारांशी नाळ घट्ट जोडली जाणार आहे.’’ संवाद यात्रा शहर व परिसरात भागाभागांत घरोघरी पोचणार आहे. कामागारांसह त्यांच्या कुटुंबांचे हक्क, कायद्यांबाबत जनजागृती केली जाईल.
२७ मार्च ते १ एप्रिल या काळात संवाद यात्रेचे नियोजन केले असून आपापल्या भागात सर्व यंत्रमाग कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.
पत्रकार बैठकीस हणमंत लोहार, राजेंद्र निकम, मदन मुरगुडे, आनंदा गुरव, सुनील बारवाडे, रियाज जमादार, बंडा सातपुते, शिवानंद पाटील, जमदम नदाफ आदी उपस्थित होते.