वाचनाची रूची वाढवतोय ‘सृजन वाचनकट्टा’

वाचनाची रूची वाढवतोय ‘सृजन वाचनकट्टा’

ich293.jpg
92172
इचलकरंजी : उमलत्या वयातील मुलांसाठी सृजन वाचनकट्टा बहरत आहेत.

वाचनाची रूची वाढवतोय ‘सृजन वाचनकट्टा’
इचलकरंजीत तीन ठिकाणी उपक्रम; मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढती
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.२९ : स्क्रीन टाईममध्ये भरडलेल्या मुलांना वाचनात दंग करत शहरात सृजन वाचनकट्टा उपक्रम वाचनाची रूची वाढवत आहे. शहरात तीन ठिकाणी चालणाऱ्या वाचन कट्ट्यावर दिवसेंदिवस मुलांमध्ये वाचनाची आवड वाढत असून मुलांची संख्याही वाढत आहे. मुलांना एकमेकांच्या साथीने वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच नवीन शब्दांचा अर्थबोध व्हावा या हेतूने निर्माण झालेल्या या कट्ट्याचा उद्देश सफल होत आहे. यातून टीव्ही, व्हिडीओतून रेडीमेड गोष्टी पाहण्यापेक्षा थेट वाचनामुळे मुलांची कल्पनाशक्ती वाढावी, एकाच गोष्टीच्या अनेक प्रतिमा, छबी त्यांच्या कल्पनेनुसार विस्ताराव्यात हा प्रयत्न आहे.
येथील मालती माने विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर यांनी काही समविचारी तरुणांना एकत्र करत कोरोनात मोठ्यांसाठी ऑनलाईन वाचनकट्टा सुरू केला. त्यानंतर आजकालच्या स्पर्धेच्या, धावपळीच्या युगात वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक ताकद थोडी कमी पडते, असे दिसून आल्यानंतर मुलांसाठी हा चांगला उपाय शोधून काढला. मोठ्यांच्या वाचनकट्ट्याप्रमाणे त्यांनी २०२१ मध्ये मुलांचाही वाचनकट्टा सुरू केला आहे. भोने मळा येथे पालकांची बैठक घेवून कामगार वस्तीत सृजन वाचनकट्टाचा पाया रोवला. त्याचा चांगला परिणामही दिसू लागल्याने हा वाचनकट्टा समृध्द झाला. शहरात त्यापाठोपाठ अण्णाभाऊ साठे मैदाननजीक झोपडपट्टीत भागात तर तिसरा वाचनकट्टा कबनूर येथे सुरू केला आहे. यानिमित्त मुले वाचनातून चांगल्या विचारांचे आदानप्रदान करत असून चांगले, आवडीचे वाचायला मिळत असल्याने ती मनापासून वाचत आहेत.
अखंडितपणे प्रत्येक आठवड्याला निश्चित एकाच्या घरी वाचनकट्टा भरवला जात आहे. यासाठी संवादक व समन्वयक असे दोघेजण काम पाहतात. वाचनकट्टा चालवण्यासाठी अनेक तरुणच उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत. बालसाहित्य, महामानवांचे पुस्तके वाचनासाठी ठेवली जातात. यातून मुलांमध्ये प्रगल्भता निर्माण होवू लागली आहे. उमलत्या वयातील मुलांसाठी हे वाचनकट्टे शहरात बहरत आहेत. लोकांच्या मदतीतून किमान पुस्तके एकत्र करून नव्या सृजन वाचन कट्ट्यांसाठी प्रयत्न सातत्याने सुरूच ठेवला आहे.
---------
वाचनाबरोबर बरेच काही
वाचनकट्ट्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची नकारात्मक, संकुचित मानसिकता बदलून त्यांच्यात ऊर्जा निर्माण होत आहे. वाचानाबरोबर लेखन, चिंतन, मनन, चर्चाही केली जात आहे. यातून कल्पनाशक्तीला वाव तर बद्धीला प्रभावी चालना मिळू लागली आहे. येत्या काळात विवेकी नागरिक बनवून समाजपरिवर्तनाचे धडेही गिरवले जाणार आहेत.
---
सृजन वाचनकट्टा अंतर्गत दर रविवारी सायंकाळी लालबहादूर शास्त्री सोसायटी येथे पाच वाजता न चुकता मुले जमतात. पुस्तके वाचतात, शंका विचारतात. यातून मराठी भाषा समृद्धी तर होत आहेच पण मुलांना व्यक्त होण्यासाठीचा हा अवकाश आम्हाला महत्वपूर्ण वाटतो.
-गौरी कोळेकर, संवादक, सृजन वाचनकट्टा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com