बळीराजा उन्हाळी मशागतीत व्यस्त

बळीराजा उन्हाळी मशागतीत व्यस्त

06151
शिरोळ : उन्हाळी मशागतीत शेतकरी व्यस्त झाला असून ट्रॅक्टरने जमीन नांगरणी सुरू आहे.
----------------
बळीराजा उन्हाळी मशागतीत व्यस्त
रान टणक होण्यापूर्वी नांगरणी; बैलांऐवजी यांत्रिकीकरणास पसंती
इचलकरंजी, ता.२३ : खरिपाच्या अपेक्षा ठेवत रखरखत्या उन्हात बळीराजा उन्हाळी मशागतीसाठी सरसावला आहे. आकाशात भरून येणाऱ्या नभासोबत शेतकऱ्यांचे खरिपाचे स्वप्नही मनात रंगत आहे. ऊसासह रब्बी पिकातून रिकामे झालेले रान टणक होण्यापूर्वी शेतकरी नांगरणीचे कामे पूर्ण करत असल्याचे चित्र शिवारात पहायला मिळत आहे.
एप्रिल महिन्यातच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. सध्या रान मोकळे झाले असून रान भेगाळू लागल्याने मशागतीची धास्ती घेऊन शेतकरी खरीप मशागतीकडे आतापासूनच आकर्षित झाला आहे. जमीन भेगाळल्याने शेतकरी उन्हाळी मशागतीत मग्न झाला असून सर्वत्र शेत नांगरण्यावर भर देत आहेत. शेतकऱ्यांनी बैलांऐवजी यंदाही यांत्रिकीकरणास पसंती दर्शवत ट्रॅक्टरच्या नांगरटीवर भर दिला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टरच्या नांगरणीचे दर वाढले आहेत. यामुळे बैलांच्या सहाय्याने नांगरणीकडे सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आता उन्हाळ्यातच जमीन नांगरल्यास जमीन भेगाळण्याचा ताण न राहता जमीन ऊन खाऊन चांगली पिकते. काही ठिकाणी कोरडवाहू शेताची नांगरणी होऊन उन्हाळी मशागती आटोपल्या आहेत. बागायती क्षेत्रात मशागती सुरु असल्याचे दिसत आहेत. ट्रॅक्टरने शेत नांगरताना ट्रॅक्टरजवळ जमिनीतून निघणारे किटक खाण्यासाठी बगळ्यांची रेलचेल झाल्याचे पाहून बगळ्याची शाळाच भरल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे.
दिवसेंदिवस शेतीमालाचे बाजारभाव कमी होत असून मागणी मात्र वाढताना दिसत आहे. मजूरटंचाई व मजुरीच्या वाढत्या दराबरोबरच रासायनिक खतांच्या वाढत्या किंमतीमुळे शेती व्यवसाय अवघड झाला आहे. शेतीत केलेला खर्च व उत्पादनाच्या बाजारातून मिळणाऱ्‍या पैशांचा मेळ बसत नाही. त्यामुळे दिवसागणिक शेतकऱ्‍यांची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली आहे. वाढत्या महागाईमुळे शेतीसाठी लागणारा खर्च करावाच लागतो. त्याचप्रमाणे मशागतीसाठीही मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. मशागतीचे दरही गगनाला भिडले आहेत. वारंवार नैसर्गिक संकटांचा सामना करत उत्पादीत केलेल्या शेतमालास पुरेसा बाजारभावही मिळत नसल्याने शेतकऱ्‍यांचे अर्थकारण बिघडले आहे.
------
शेतमजुरांची मनधरणी
दहा बारा वर्षापूर्वीची परिस्थीती आता राहिली नाही. मजुरांचे वाढते भाव, त्यांचे स्थलांतर व वाढत्या तापमानाचा परिणाम या सर्व गोष्टीवर होत आहे. शेतातील काडी कचरा वेचायलासुध्दा मजुराची मनधरणी करावी लागत आहे. त्यामुळे काही शेतकरी ट्रॅक्टरने रोटा व्हेटर वापरून मशागत करून घेत असल्याचे दिसत आहे.
-----
शेण खताचा तुटवडा
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी शेतकरी सेंद्रिय खत म्हणून शेण खताकडे वळत आहेत. नांगरणी करून शेतकरी शेणखत विकत घेऊन ते शेतामध्ये पसरतात. यंदा मात्र शेणखताची परिस्थिती गंभीर झाली आहे. मागणी अधिक असून पुरवठा कमी प्रमाणात आहे. पशुपालक शेतकऱ्यांना शेणखत सहज उपलब्ध होत असून अधिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र खताचा तुटवडा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com