
फसवणूक एक अटक
अपत्यप्राप्ती करून देतो असे
सांगून विनयभंग करणाऱ्यास अटक
इचलकरंजी, ता.१५ : अपत्यप्राप्ती करून देतो असे सांगत महिलेचा विनयभंग करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. रामदास चंद्रकांत शेटके (रा. कोरोची, ता.हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणातील बाळू उर्फ पिंटू शेटके व अशोक उर्फ बबलू तातोबा कांबळे हे दोघे अद्याप फरारी आहेत. ही घटना महिन्याभरापूर्वी घडली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, पिडीत महिला माहेरी असताना रामदास शेटके व बाळू शेटके या दोघांनी देवीची पूजा करून अपत्यप्राप्ती करून देतो, असे सांगून गुगल पे द्वारे १ लाख ८५ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर दोघांनी देवी अंगात आल्याचे हावभाव करून १५ हजार रुपये किंमतीची ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घेतली. तसेच रामदास याने वारंवार विनयभंग करत काढलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आणखी ४० हजार रुपये उकळले. तसेच घरदार संपवण्याची धमकी देत पुन्हा एकदा पीडित महिलेकडील २३ हजार रुपये काढून घेतले. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार तीन जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिघे महिन्याभरापासून फरार होते. अखेर पोलिसांनी मुख्य संशयित रामदास शेटके याला अटक केली.