हद्दपार गुंडांचा इचलकरंजीत वावर

हद्दपार गुंडांचा इचलकरंजीत वावर

फोटो - संग्रहित
----------------
हद्दपार गुंडांचा इचलकरंजीत वावर
वाढता उपद्रव घातक; पोलिसांचा जरब होतोय कमी
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २४ : कोणी मुलाचा वाढदिवस, कोणी एखाद्याचा वचपा काढण्यासाठी दहशत निर्माण करत आहेत. अनेकजण बिनधास्तपणे शहरात फिरत आहेत. ही विदारक परिस्थिती इचलकरंजीत आहे हद्दपारीची कारवाई केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची. त्यांचा वाढता उपद्रव शहरासाठी घातक ठरत आहे. यातून पोलिसांची त्यांच्यावरील जरब कमी होताना दिसत आहे.
शहरात समाज व कायद्याच्या दृष्टीने घातक ठरणाऱ्या टोळ्यांसह व्यक्तिगत गुन्हेगारांवर पोलिसांकडून हद्दपारीची कारवाई केली जात आहे. त्याबाबत पोलिसांकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येतो. त्यात जिल्हा पोलिस अधीक्षक टोळ्यांना हद्दपार करतात. प्रांताधिकाऱ्यांकडून व्यक्तिगत गुन्हेगारांची हद्दपारी होते. शहर व परिसरातील मारामारी, गुंडागर्दी, सामाजिक शांतता भंग करणे, गर्दी मारामारी, जातीवाचक शिवीगाळ, गंभीर जखमी करणे, घरात घुसून मारहाण, खंडणी मागणे, बेकायदा हत्यार बाळगणे अशा विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या शेकडो रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एखाद्याकडून दोन अथवा तीनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे घडल्यास त्याच्यावर पोलिस उपाधीक्षक कार्यालयाकडून हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला जातो. यातून शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता टिकवून ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न मात्र अलीकडच्या काळात सपशेल फेल ठरत आहे.
कारवाईच्या काळात शहरात बंदी असतानाही अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार शहरात मोकाटपणे फिरत असताना पोलिसांना मिळून आले आहेत. तसेच जुन्या वादाचा राग काढत मारहाण दहशत करण्यापर्यंत गुन्हेगारांची मुजोरी वाढली आहे. असे गंभीर गुन्हे करून गुन्हेगार पुन्हा शहरातून पसार होत आहे. हद्दपार कारवाई झाल्यानंतरही दिसून आल्यामुळे पोलिस अशांवर पुन्हा नव्याने कारवाई करतात. पण बंदी आदेश झुगारून दहशत माजवणे, शहराच्या हद्दीत फिरणे ही प्रवृत्ती वाढीस लागली आहे.
-----
गुन्हेगारांची हद्दपारी कागदावर
हद्दपार झालेल्या गुंडाला कोणत्या भागात सोडले, याची नोंद पोलिसांकडे असते. ज्या भागात संशयित आहे. तेथील पोलिसांकडे त्याची रोजची हजेरी असते. या प्रक्रियांना डावलून बंदी असलेल्या भागात त्याची एन्ट्री पोलिसांच्या कारवाईला कागदोपत्रीच ठरवत आहे. शहरात आतापर्यंत शेकडोच्यावर हद्दपारी झाली. त्याचा परिणाम कितपत झाला, हा संशोधनाचा भाग आहे.
-----
कोंबिंग ऑपरेशनचे सातत्य हवे
हद्दपारी झालेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी यापूर्वी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केले आहे. यावेळी अनेक गुन्हेगार मिळून आल्याने कारवाईही केली आहे. अलीकडे कोंबिंग ऑपरेशन थंडावल्याने गुन्हेगार हद्दीत येऊ लागले आहेत. बंदी असूनही गुंड येतातच कसे? त्यांचे आश्रयदाते कोण? त्यामागचे नेमके गौडबंगाल काय? याचा शोध घेण्याचे आव्हान आणि कोंबिंग ऑपरेशनचे सातत्याने राबवणे गरजेचे आहे.
---
पेट्रोलिंगच्या माध्यमातून हद्दपार, तडीपार केलेल्या गुन्हेगारांवर वॉच ठेवला जात आहे. पोलिसांची नजर चुकवून असे गुन्हेगार फिरण्याचा प्रयत्न करतात. अशांवर अंकुश ठेवण्यासाठी स्वंतत्र यंत्रणा राबवली जाणार आहे.
रामेश्वर वैजणे, प्रभारी पोलिस उपअधीक्षक, इचलकरंजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com