हत्यारांची पाळेमुळे खोदण्याचे आव्हान

हत्यारांची पाळेमुळे खोदण्याचे आव्हान

हत्यारांची पाळेमुळे खोदण्याचे आव्हान
सहज उपलब्ध; विविध कारणांनी इचलकरंजी बाळगणाऱ्यांची संख्या वाढती
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २८ : गुन्हेगारीमध्ये वर्चस्व राहिले पाहिजे, आपली दहशत कायम राहून लोकांनी आपल्याला घाबरले पाहिजे, राडा करता आला पाहिजे, या आणि अशा अनेक कारणांनी शहरात धारदार शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. किरकोळ मारहाण, खून, खुनी हल्ले अशा गुन्ह्यांत घातक हत्यारे पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. सहज मिळणाऱ्या हत्यारांची पाळेमुळे खोदून काढण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे.
आपापसातील खुन्नस काढण्यासाठी किरकोळ कारणावरून होणाऱ्या भांडणांच्या रागातून तलवारी, कोयत्याने वार करून खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजवण्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांसाठी या तरुणांकडे तलवारी, कोयते यांसह विविध घातक हत्यारे सहज उपलब्ध होत आहेत. घातक शस्त्रे सर्रासपणे उपलब्ध होत असूनही पोलिसांकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची स्थिती आहे. यापूर्वी जुना बाजार, शेती आणि बांधकाम साहित्याच्या दुकानांमध्ये अवजारांची विक्री होत होती. मात्र, पोलिसांमुळे आता कोयत्यांची विक्री होत नाही, तरीही शहराच्या वेगवेगळ्या भागांत छुप्या पद्धतीने कोयता, तलवारी अशी हत्यारे मिळतात. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती अधिकच्या दराने त्या खरेदी करतात. ग्रामीण भागामध्ये शेतीची अवजारे बनवणाऱ्या ठराविक व्यक्तींकडून कोयते, तलवारी यांसारखी हत्यारे बनवून घेतली जातात. त्यानंतर दलालांमार्फत ती शहरात पोहोचवून त्याची विक्री केल्याचे बोलले जाते.
शहरातल्या हाणामाऱ्यांसह गंभीर गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांसह तरुणांचा सहभाग वाढत आहे. तसेच घातक हत्यारे सोबत बाळगण्याची ‘फॅशन’ या तरुणांत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. आधीच सोशल मीडियावर तलवारी व घातक हत्यारांचे फोटो ठेवून दहशत निर्माण करण्याची क्रेझ तरुणाईत वाढत आहे. अशा परिस्थितीत हत्यारे बाळगणाऱ्यांच्या पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळण्यासह घातक हत्यारे येतात कोठून याचा शोध घ्यायला हवा.
----
घातक शस्त्र बाळगण्याची कारणे -
* गंभीर गुन्हा करण्यासाठी
* दादागिरी, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी
* आकर्षण किंवा हौस
*हत्यारे बाळगण्याचे ‘फॅड’
------
शस्त्र विरोधी पथक हवे
शहरात विविध पोलिस ठाण्यात दरदिवशी मारहाण, प्राणघातक हल्ला, लुटणे अशा गुन्ह्यांची नोंद होत आहे. यामध्ये घातक हत्यारांचा वापर झाल्याचे समोर येते. यातून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यातून परिसरात दहशत माजवली जाते. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात नाही. हत्यारांसंबंधीचे दाखल गुन्हेही किरकोळ आहेत. वाढत्या गुन्हेगारीत पोलिसांनी शस्त्रविरोधी पथक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.
---------
कोट
बहुतांश गुन्ह्यांत घरगुती हत्यारांचा वापर होत आहे. गंभीर गुन्ह्यांत घातक हत्यारे अधिक दिसत आहेत. याचा तपास करून घातक हत्यारे वापरण्यावर निर्बंध आणला जाईल.
-निकेश खाटमोडे- पाटील, अपर पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com