
फसवणूक कोठडीत वाढ
सूत व्यापारी फसवणूकप्रकरणी
दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ
इचलकरंजी, ता.२ : सूत व्यापारी फसवणूकप्रकरणी अटकेतील दोघांच्या पोलिस कोठडीत आणखी वाढ झाली आहे. मुख्य संशयित पंकज अग्रवाल, प्रविण अग्रवाल यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पंकज अग्रवाल हा उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल आहे. मात्र न्यायालयाने पोलिसांकडे हक्क राखत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणातील पंकज अग्रवाल याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली.
सूत खरेदीपोटी बोगस व बनावट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करून १ कोटी ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करून मुख्य संशयित पंकज पुष्पक अग्रवाल आणि प्रविण पुष्पक अग्रवाल (रा. पियूष टेक्स्टस्टाईल) या दोघा भावांना अटक केली. आज दोघांची पोलिस कोठडी संपल्यानंतर दोघांना पुन्हा आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांना पुन्हा आणखी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पंकज अग्रवाल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.
या प्रकरणातील पियुष पंकज अग्रवाल, मयुर पंकज अग्रवाल, पुष्पक अग्रवाल आणि प्रितेश शहा (सर्व रा. इचलकरंजी) हे चार जण अद्याप फरार आहेत. पंकज अग्रवाल याच्याविरोधात सूत खरेदी विक्री व्यापारी गोपीकिशन डागा यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अनेक तक्रारदार आता पुढे येत आहे. मात्र पंकज अग्रवाल विरोधात पोलिस ठाण्यात अद्याप दुसरा फसणुकीचा गुन्हा दाखल झाला नसल्याचेही पोलिस निरीक्षक श्री. हाके यांनी सांगितले.