
तेरा हजार मुलांच्या चेहऱ्यावर हसू
03075
----
तेरा हजार मुलांच्या चेहऱ्यावर हसू
वसुंधरा कोले यांचा उपक्रम; सहा महिन्यांत साडेआठ लाखांची खेळणी वाटप
जयसिंगपूर, ता. १० : गरीब आणि वंचितांसाठी काहीतरी करावे, अशी अनेकांची इच्छा असते. त्यांच्यातले काही जण पुढे येतात आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात. त्यांचे हेच काम पोटासाठी राबराब राबणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी लाख मोलाचे ठरते. राबणाऱ्या चिमुकल्या हातांवर वेगवेगळी खेळणी आल्यानंतर त्यांच्या निरागस चेहऱ्यावरील फुललेले हास्य केलेल्या कामाचे चीज करून जाते आणि अशा कामाचा छंद जपलाय तो इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ च्या डिस्ट्रिक्ट आय.एस.ओ. सौ. वसुंधरा अजित कोले यांनी. सहा महिन्यांत तब्बल १३ हजार मुलांना साडेआठ लाखांची खेळणी देऊन त्यांनी हा छंद जपला आहे.
त्यांनी सातत्याने समाजभान राखत पर्यावरणासह वंचित घटकांसाठी कार्य केले आहे. इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ च्या माध्यमातून १४ नोव्हेंबर २०२१ रोजी बालदिनापासून त्यांनी हे कार्य हाती घेतले आहे. गोरगरीब आणि राबणाऱ्या मुलांसाठी तळमळ असणाऱ्या लोकांच्या योगदानातून त्यांनी सहा महिन्यांत तब्बल साडेआठ लाख रुपयांची खेळणी वाटप केली आहेत.
महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर कर्नाटकातील अनेक भागांत त्यांनी खेळण्यांच्या माध्यमातून राबणाऱ्या कोवळ्या, निरागस चेहऱ्यांवर हास्य फुलवले आहे. ऊसतोड, वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसह भीक मागणारी मुले, मूकबधिर शाळा, हॉस्पिटल तसेच पालकांच्या गुन्हेगारीमुळे तुरुंगात मातांबरोबर शिक्षा भोगणाऱ्या त्यांच्या लहान मुलांना खेळण्यांच्या माध्यमातून त्यांच्या बालपणाला खेळण्यांची सोबत दिली आहे. याकामी त्यांना डिस्ट्रिक्ट चेअरमन रत्ना बेहरे, आय.एस.ओ. ममता जैन, सुवर्णा गांधी, प्रीती शिवपन्नामठ, सविता तंगडी, मधुरा जोशी, विना तिरलापूर, कंचन गौडर यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.
....
03076
इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ च्या माध्यमातून आणि गरीब मुलांसाठी काहीतरी करण्याची मानसिकता असणारी लोकांच्या सहकार्याने हे काम करता आले. १३ हजार गरीब मुलांना खेळणी देऊन त्यांचे बालपण जपण्याचे काम विशेष आनंद देऊन जाते. पती आर्किटेक्ट अजित कोले यांचेही याकामी प्रोत्साहन मिळत आहे.
-सौ. वसुंधरा कोले, डिस्ट्रिक्ट आय.एस.ओ. इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02610 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..