
जिल्ह्यातील १९ गावांना नगर पालिकेची प्रतीक्षा
जिल्ह्यातील १९ गावांना नगरपालिकेची प्रतीक्षा
सर्वपक्षीय प्रयत्न हवेत; पात्र गावातून दबाव सुरू
गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १२ : इचलकरंजी महानगरपालिकेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जयसिंगपूर ही जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून पुढे आली आहे. दरम्यान, कोरोनामुळे २०२१ ची जनगणना रखडली. होणाऱ्या जनगणनेनंतर जयसिंगपूर ही ''अ'' वर्ग नगरपालिका होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील १९ मोठ्या गावांना नगरपंचायत आणि नगरपालिकेची प्रतीक्षा लागली आहे. यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न होणे आवश्यक आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाने या गावांना हा दर्जा द्यावा असा या गावांचा सूर आहे. यासाठी कबनूर शहरासह काही गावांनी शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आठ वर्षांपूर्वी जिल्ह्यातील १९ गावांना नगरपंचायत आणि नगरपालिकेचा दर्जा मिळण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय दिला होता. पण त्या दृष्टीने हालचाली झाल्या नसल्याने पुढील प्रक्रिया थंडावली. जिल्ह्यातील निमशहरी गावांचा आठ-दहा वर्षांत झपाट्याने विस्तार झाला. यातून नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या मागणीला बळ मिळाले. सातत्याने मागणी करूनही शासन पातळीवर ही मागणी बेदखल ठरल्याने आता शासनावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. नगरपालिका दर्जा मिळण्यासाठी उदगावमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्काराच्या आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला होता.
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत या गावांना हा दर्जा मिळणे योग्य असले तरी त्यादृष्टीने हवा तसा प्रयत्न झाला नाही. इचलकरंजी नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा मिळणार असल्याने आता या गावांमध्ये उठाव होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या नेत्यांसह स्थानिक नेत्यांनी एकदिलाने प्रयत्न केल्यास या पात्र गावांचा नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये समावेश होऊ शकतो.
२०१७ मध्ये हातकणंगले तालुक्यातील कबनूर, कोरोची, कुंभोज, पट्टणकोडोली, रेंदाळ, रुकडी, पुलाची शिरोली, तारदाळ, शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट, उदगाव, नांदणी, दानोळी, करवीर तालुक्यातील उचगाव, पाचगाव, गांधीनगर, मुडशिंगी, वडणगे, भुदरगड तालुक्यातील गारगोटी या गावात नगरपंचायत व नगरपालिका स्थापन करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. याबाबत शासनाने या गावातून नगरपालिका, नगरपंचायत स्थापण्यात अडचण नसल्याचा अभिप्रायदेखील दिला होता. मात्र, अद्याप हा प्रश्न मार्गी लागला नाही. स्वच्छता, कर वसुली, विकास, पाणीपुरवठा, कर्मचारी पगार, तोकडा निधी यासह विविध समस्यात अडकलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना विकास साधणे अडचणीचे होत आहे.
....
मिळणार या सुविधा
नगरपालिकेनंतर मुख्याधिकारी, अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, आरोग्य अधिकारी, लेखापरीक्षक, शिक्षणाधिकारी यांसह विविध अधिकारी मिळणार आहेत. पाणीपुरवठा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, बॉम्बे टाऊन प्लॅनिंग अॅक्ट १९५४ अन्वये नगरपालिकांनी अंगीकारलेल्या विकास व नगररचना योजना, नगरपालिकेचे अधिकारी व सेवकांचा महागाई भत्ता, सार्वजनिक आरोग्य, अग्निशमन व्यवस्था, रस्ते बांधणी व दुरुस्ती व राज्य सरकार वेळोवेळी ठरवतील त्या सुविधा मिळू शकणार आहे.
....
यांना मिळू शकेल पालिकेचा दर्जा
उदगाव, कबनूर, कोरोची, पट्टणकोडोली, रुकडी, शिरोली पुलाची, कोडोली उचगाव
....
या गावांना मिळू शकेल नगरपंचायतीचा दर्जा
पंधरा हजार लोकसंख्यावरील नांदणी, दानोळी, अब्दुललाट, कुंभोज, रेंदाळ, तारदाळ, गारगोटी, पाचगाव, गांधीनगर, मुडशिंगी, वडणगे या गावांचा नगरपंचायतीत समावेश होऊ शकतो.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02618 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..