
टुडे पान एक
3234
३७ हजार कुटुंबांना स्थलांतरांच्या नोटिसा
शिरोळ तालुक्यातील ४३ पूरबाधित गावांबाबत प्रशासनाच्या हालचाली
गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता.१ : शिरोळ तालुक्यातील ४३ गावांतील ३७ हजार पूरग्रस्त कुटुंबांना प्रशासनाकडून दोन दिवसांत नोटिसा बजावल्या जाणार आहेत. महापुराच्या काळात स्वतःच्या जबाबदारीवर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना या नोटिशीत करण्यात येणार असल्याने पूरग्रस्त गावांमध्ये खळबळ उडणार आहे. ही सारी कुटुंबे त्याने अस्वस्थ होणार आहेत.
महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यातील जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. गेल्या काही वर्षांतील महापुराचे अनुभव लक्षात घेता प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील पूरबाधित ४३ गावांतील ३७ हजार कुटुंबांना त्या त्या ग्रामपंचायतीतर्फे
नोटिसा दिल्या जाणार आहेत.
दोन दिवसांत या नोटिसा लोकांच्या हाती पडतील. इतर वेळी जीवनदायिनी ठरणाऱ्या तालुक्यातील चार नद्या पावसाळ्यात मात्र धडकी भरविणाऱ्या ठरत आहेत. नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसतो. २००५ आणि २०१९ च्या महापुराचे पूर्वानुभव लक्षात घेऊन प्रशासनाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत.
महापुराआधी या गावातील ३७ हजार कुटुंबांच्या स्थलांतरासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे. पशुधनाचीही विशेष काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. शासन पातळीवर प्रभावी उपाययोजना राबवून तालुक्याला पूरमुक्त करण्याची मागणी होत असताना प्रशासनाकडून लागू केल्या जाणाऱ्या या नोटिसांमुळे प्रशासन पूरग्रस्तांची जबाबदारी झटकत आहे का, असा सवाल उपस्थित होणार आहे.
महापुराची तयारी दृष्टिक्षेपात
* बाधित गावातील पाईपलाईन दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर
* बेटांचे स्वरूप प्राप्त होणाऱ्या गावांसाठी पुरेसा औषधसाठा
* पशुवैद्यकीय दवाखानामध्येही औषधांचा साठा
* गटरींमधील गाळ काढून प्रवाहित केले जाणार
* फॉगिंग मशिन दुरुस्तीचे आदेश
* पुरेशा किटकनाशकांची खरेदी करण्याचे ग्रामपंचायतींना आदेश
महापुराचे गत अनुभव लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासन पुरेशी खबरदारी घेत आहे. त्याचाच भाग म्हणून शिरोळ तालुक्यातील ४३ गावांमधील कुटुंबांना नोटिसा लागू केल्या जाणार आहेत.
-शंकर कवितके, गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिरोळ.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02705 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..