
पावसाची उसंत; पुराचीही धाकधूक
पावसाची उसंत; पुराचीही धाकधूक
ऑगस्ट अखेरपर्यंत भीती; पूर ओसरल्याने तूर्त दिलासा
जयसिंगपूर, ता.२१ : महापुराला २००५ मध्ये २३ जुलैपासून सुरुवात झाली होती. २०१९ मध्ये २७ जुलैला तर गतवर्षी ३ ऑगस्टपासून महापुराने थैमान घातले. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी महापुराचा धोका मात्र अद्याप शिरोळ तालुक्यावर घोंगावत आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत महापुराची धाकधूक कायम राहणार असून नद्यांच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे.
यावर्षी एक महिना उशिरा सुरू झालेल्या पावसाने जोरदार बॅटिंग केली. आठ-दहा दिवसांतच नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली. पंचगंगा इशारा पातळीपर्यंत येऊन ठेपली. कृष्णेच्या पाण्याच्या पातळीतदेखील इंचा इंचाने वाढ होईल तशी भीतीही वाढत होती. शिवाय प्रशासनाकडून संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन पूरग्रस्त गावांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना केल्यामुळे यावर्षीही महापूर येतो की काय अशी मनस्थिती या गावांची झाली होती.
मात्र, चार दिवसांपासून पावसाने चांगलीच उसंत घेतल्याने पात्राबाहेरील पाणी पुन्हा पात्रात गेले आहे. यामुळे तालुक्यातील पूरग्रस्त गावांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी गेल्या तीन वेळच्या महापुराचा विचार करता पावसाचा जोर वाढलाच तर पुन्हा तालुक्याला पुराचा अथवा महापुराचा फटका बसू शकतो. केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांप्रमाणे यावर्षी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन केले आहे. शिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सुसंवादामुळे पुराचा फटका कमी वाटत असला तरी पावसाचे प्रमाण आणि धरणातील विसर्ग यावरच पुराचा धोका अवलंबून आहे. सध्या सरासरी ७५ टक्के धरणे भरली आहेत. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन दोन्ही राज्यातील सरकारने धरणातील पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.
२००५ मध्ये २३ जुलैपासून महापुराला प्रारंभ झाला होता. अलीकडच्या काळातील हा पहिलाच महापूर असल्याने पूरग्रस्त गावातील लोकांना वाढत्या पाण्याचा अंदाज आला नाही. शिवाय दिवसभर उघडीप देणारा पाऊस रात्री मात्र धो धो बरसत राहिल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढत गेल्याने पाऊस आणि विसर्ग यामुळे तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला होता. यात कोट्यावधी रुपयांच्या पिकांचे तर नुकसान झालेच शिवाय पडझड झालेल्या घरांची संख्याही मोठी होती.
२०१९ मध्ये २७ जुलैपासून महापुराला प्रारंभ झाला. गतवर्षी ३ ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण वाढून महापुराला सुरुवात झाली होती. त्यामुळे सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी महापुराचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. आणखीन एक महिना तरी शिरोळ तालुक्यावरील महापुराचे संकट घोंगावत राहणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02911 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..