
राख्यांनी जयसिंगपूर बाजार फुलला
राख्यांनी जयसिंगपूर बाजार फुलला
स्टोन राख्यांचीही क्रेझ; मोठी उलाढाल अपेक्षित
जयसिंगपूर, ता. ५ : दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त रक्षाबंधन साजरा केला जात आहे. यावर्षी शहरातील बाजारात डिझायनर, स्टोन आणि फॅन्सी राख्यांची क्रेझ असून शहरातील प्रमुख मार्गांवर रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलला आहे. आठवडाभरावर रक्षाबंधन आला आहे. हळूहळू खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. फॅन्सी, पेंडंट, स्टोन, झरदोजी, लुंबा, डोरी आदी प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. महिलांमध्ये स्टोनच्या राखीची विशेष क्रेझ आहे. यावर्षी निर्बंधमुक्त रक्षाबंधनामुळे बाजारात राख्यांच्या विक्रीतून मोठी उलाढाल अपेक्षित आहे.
कोरोनामुळे दोन वर्ष राखी पौर्णिमेवर मर्यादा आल्या होत्या. दोन वर्षांनंतर राख्यांचा बाजार भरला आहे. यामुळे बाजारात उत्साह दिसत असून बाजार गजबजला आहे. यावर्षी स्पंज आणि फॅन्सी स्टोनच्या राख्यांना विशेष पसंती आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत शहरात या राख्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. शहरात सुमारे दोनशेहून अधिक राखी विक्रेत्यांची संख्या आहे.
दरम्यान, कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने राख्यांच्या दरात सुमारे पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय अनेक ठिकाणी कल्पकतेने घरीच राख्या बनवून विक्री केली जात असून याचाही बाजारातील राख्यांच्या विक्रीवर काहीसा परिणाम झाला आहे. बाजारात ईव्हिल आय राख्या महागड्या दराने विकल्या जात आहेत. नवनवीन डिझाइनच्या राख्या बाजारात दिसत असल्याने दोरीवरील मोठ्या गोल आकारातील राख्या नामशेष होऊ लागल्या आहेत. नाजूक डिझाइन असलेल्या राख्यांना मागणी अधिक आहे. लहानग्यांसाठी कार्टुनच्या राख्यांनाही मोठी पसंती असते. ही बाब लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी अशा राख्या उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये सिल्वर गोल्डन कोट असलेल्या राख्यांचे प्रमाण अधिक आहे. गोंडा, राजस्थानी, रेशीम, स्पायडरमॅन, मिकीमाउस, डोनाल्ड डक, स्टोन राखी, डिस्को लाईट, जु जू वंडर बॉय राख्यांचा समावेश आहे.
....
कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने साहजिकच राख्यांच्या दरात ही सुमारे पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गतवर्षी कोरोनामुळे रक्षाबंधनवर मर्यादा होत्या. यावर्षी निर्बंधमुक्त रक्षाबंधनामुळे बाजारात राख्यांच्या खरेदी-विक्रीची रेलचेल सुरू आहे. विविध प्रकारच्या आणि विविध आकारातील राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- वैजनाथ चौगले, राखी विक्रेते, जयसिंगपूर
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02966 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..