उत्पादन खर्च २७ हजार; उत्पन्न ८ हजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्पादन खर्च २७ हजार; उत्पन्न ८ हजार
उत्पादन खर्च २७ हजार; उत्पन्न ८ हजार

उत्पादन खर्च २७ हजार; उत्पन्न ८ हजार

sakal_logo
By

उत्पादन खर्च २७ हजार; उत्पन्न ८ हजार
सोयाबीन उत्पादकांची अवस्था; १८ टक्के जीएसटीची भर
गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ४ : उत्पादन खर्च २७ हजार आणि उत्पन्न ८ हजार अशी स्थिती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची झाल्याने नफ्या-तोट्याचा मेळ घालायचा कसा असा प्रश्‍न पडला आहे. निकृष्ट बियाणे, रोगराई आणि अतिपाऊस यामुळे सोयाबीन उत्पादकांची ही अवस्था बनली आहे. तालुक्यातील नदीकाठी असणारे सोयाबीनचे पीक पुराने गेले. हमीभावाअभावी शेतीपिकाला भाव मिळत नसताना दुसरीकडे नैसर्गिक संकटांनी बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
मे महिन्याच्या दरम्यान सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. ऑगस्टमध्ये काढणी-मळणीची धांदल सुरू होते. यावर्षी महापुराचा धोका काही प्रमाणात टाळला असला तरी नदीकाठच्या शेतातील सोयाबीनला मात्र याचा फटका बसला आहे. पूर येऊन गेल्यानंतर सोयाबीनच्या केवळ काड्याच शेतात उभ्या होत्या. मात्र, अन्य भागातील पिके चांगली येऊनही उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली. मोझ्याकच्या आक्रमणाने सोयाबीनची पाने पिवळी पडून उत्पन्नात घट झाली. यावर मात करण्यासाठी पुन्हा कीटकनाशकांचा फवारा करताना सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटकाही बसला. वर्षभरात औषधांच्या किमतीत दीडपटीने वाढ झाली आहे. कधीकाळी १० ते ११ हजार रुपये क्विंटलने विकला जाणारा सोयाबीन हंगामात चार हजार रुपयांवर आला. यामुळे काढणीचाही खर्च निघत नाही अशी स्थिती आहे. यावर्षी उत्पादन खर्च वाढून उत्पादन घटल्याने शिवाय दर गडगडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आतबट्ट्यात आला आहे.
....

जीएसटीने मोडले कंबरडे
औषधे आणि कीटकनाशकांच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत दीड ते दोन पटीने वाढल्या आहेत. यावर पुन्हा १८ टक्के जीएसटी लागू केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. यामुळे दिवसेंदिवस शेती नुकसानीची बनत आहे.
....

सोयाबीनचा उतारा घटला. पिकलेल्या सोयाबीनला भाव नाही अशा स्थितीत आर्थिक संकटाचाही डोंगर वाढत आहे. मुलांच्या शाळांची फी भरणेही कठीण बनले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच पिकाला हमीभाव दिला तरच शेतकरी टिकणार आहे. अन्यथा जगाचा पोशिंदा शेतकरी फार काळ टिकणार नाही.
- महावीर गिताजे, शेतकरी, आलास