ऊस परिषद-राजू शेट्टी पत्रकार बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस परिषद-राजू शेट्टी पत्रकार बैठक
ऊस परिषद-राजू शेट्टी पत्रकार बैठक

ऊस परिषद-राजू शेट्टी पत्रकार बैठक

sakal_logo
By

दराबाबत आंदोलनाची दिशा
ऊस परिषदेत स्पष्ट करू
राजू शेट्टी ः ‘स्वाभिमानी ’ची शनिवारी ऊस परिषद
जयसिंगपूर, ता. १२ : गत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये, कारखान्यांची काटामारी आणि यावर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी व जादाचा दर या तीन मुद्द्यांवरून यंदाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २२ वी ऊस परिषद शनिवारी (ता. १५) जयसिंगपुरात होत आहे. परिषदेची तयारी पूर्ण झाली असून यात ऊस दराबाबत आंदोलनाची दिशा स्पष्ट करू, असा इशारा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत बोलताना दिला.
शेट्टी म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने सर्व गोष्टी ऑनलाईन केल्या आहेत. ई-पीक नोंदणी, सातबारा असे सर्व ऑनलाईन असताना राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन नाहीत. त्यामुळे साखर आयुक्तांनी तातडीने हे वजन काटे नियंत्रित ठेवण्यासाठी काटे ऑनलाईन करावेत, अन्यथा हंगाम बंद पाडू. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी अधिक दोनशे रुपये प्रतिटन मागितले होते. ती अद्याप मिळालेली नाही. केंद्र सरकारच्या कोणत्याही परवानगीविना शासनाने एफआरपीत दोन तुकडे करण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. सध्या बाजारपेठेत साखरेला ३२०० ते ३३०० रुपये दर मिळत आहे, तर दुसरीकडे अनुदानाशिवाय निर्यात झालेल्या साखरेला १५० ते २०० रुपये जादा मिळत आहेत. सरकारने साखरेचे उत्पादन नियंत्रित करण्यासाठी २० ते २५ टक्के इथेनॉल निर्मिती केल्याचा फायदा कारखान्यांना झाला आहे. त्याचबरोबर साखर आयुक्तांनी दोन वर्षांचे रिकव्हरी ऑडिट न केल्याने सध्या मिळणारी एफआरपी ही जुन्या दराची आहे. त्यामुळे तातडीने ऑडिट करून रिकव्हरी दर निश्चित करावा. राज्यात २०० कारखाने आहेत. त्यांच्या वजनातून १ कोटी ३२ लाख टन ऊस चोरला असून यातून गाळप केलेली साखर ही काळ्या बाजारात विक्री केली जाते. त्यामुळे २२५ कोटी रुपयांचा जीएसटी बुडाला.
यावेळी सावकर मादनाईक, सागर संभूशेट्टे, विठ्ठल मोरे, शैलेश आडके, रामचंद्र शिंदे, राजेश पाटील, रामचंद्र फुलारे, सागर मादनाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
....

वाहतूक मार्गात बदल व पार्किंग व्यवस्था

ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी दोनपासून सांगली-कोल्हापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहने उदगाव गाव-केपीटी-चौंडेश्वरी मार्गे, तर कोल्हापूरहून सांगलीकडे येणारी वाहने तमदलगे, निमशिरगाव बायपासमार्गे उदगांव टोलनाक्यावरून जातील. त्याचबरोबर मराठवाडा, सांगली, सोलापूर येथून येणारी वाहने मादनाईक पेट्रोल पंप, कर्नाटक व सीमाभागातून येणारी वाहने शिरोळ रोडवरील दसरा चौक, कोल्हापूर, सातारा यासह येणाऱ्या वाहनांची सरकारी दवाखाना परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.