जयसिंगपुरात पाच कोटींची उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपुरात पाच कोटींची उलाढाल
जयसिंगपुरात पाच कोटींची उलाढाल

जयसिंगपुरात पाच कोटींची उलाढाल

sakal_logo
By

जयसिंगपुरात पाच कोटींची उलाढाल
भिशी व्यवसाय; गोरगरीब, कष्टकर्यांना दिवाळीचा आधार

गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता.१७ : भिशीच्या माध्यमातून शहरात पाच कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. बहुतांश कारखान्यांनी कामगारांना अद्याप पगार अथवा बोनस दिला नसताना आठवडाभिशीतून आलेल्या पैशावर शहरातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांसह गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या दिवाळीची खरेदी सुरू आहे. शहरातील सुमारे १८ ते २० भिशींमधून सुमारे पाच कोटींची रक्कम सभासदांना वाटप करण्यात आली आहे.
शिरोळ तालुक्यात तालुक्यातील ग्रामीण भागात सहकाराचे जाळे भक्कम आहे. अडचणीच्या काळात बँका आणि पतसंस्थांचा मोठा आधार होत असतो. पण सणात गोरगरिबांना सावकारांपुढे हात पसरावे लागतात. लोकांना बचतीची सवयी लागावी व अडीअडचणीत पैसे मिळावेत यासाठी भिशीची संकल्पना पुढे आली. ऐंशीच्या दशकात शिरोळ तालुक्यात गावागावांमध्ये भिशी सुरू झाल्या.
दीपावली पाडव्याला भिशीची सुरुवात होते. आठवड्यातून ठरलेल्या एका दिवशी गोळा केली जाते. जमलेल्या पैशातून सभासदांना कर्ज दिले जाते. दोन ते पाच टक्क्यांपर्यंत व्याजाची आकारणी करण्यात येते. हा सिलसिला वर्षभर सुरू राहतो. गणेशोत्सव झाला की भिशी फोडण्याची लगबग सुरू होते. यासाठी कर्जदारांशी संपर्क केला जातो. बऱ्याचदा कर्जासाठी तगादा लावणारे कर्जदार नंतर तोंड फिरवतात असाही अनुभव भिशी चालकांना येतो. दोन महिने पाठपुरावा करून पैसे वसूल करायचे वसूल नाहीच झाले तरी भिशी चालकाने कर्ज काढून पैशाची तजवीज करायची आणि दिवाळीला भिशी फोडून सभासदांना पैसे वाटप करायचे असेही धाडस भिशी चालकांना करावे लागते.
सभासदांना घसघशीत व्याजाबरोबरच भेटवस्तूही दिल्या जातात. भिशीचे पैसे कर्ज स्वरूपात वाटणे आणि त्याची वसुली करणे हे मोठे कौशल्य ज्यांना जमते त्यात तेच भिशी चालक यशस्वीपणे हे काम हाताळतात. हातावरची पोटे असणाऱ्यांना याच भिशीचा मोठा आधार असतो. ५२ आठवडे पैसे भरायचे आणि दिवाळीला व्याजासह त्याचा मोबदला मिळवायचा आणि यातूनच दिवाळीचा आनंद साजरा करायचा अशी पद्धतच विशिष्ट वर्गात रूढ झाली आहे.
....

अव्वाच्या सव्वा व्याज वसुली
दर आठवड्याला जमणाऱ्या भिशीचा पैसा अव्वाच्या सव्वा व्याजाने बाजारात फिरवला जातो. कोणताही नियम, कायदा नसलेल्या या भिशीच्या व्यवसायातून काही चालकांनी माया गोळा केली. मात्र बऱ्याचदा कर्जदाराने कायद्याचा धाक दाखवत कर्ज बुडवले. त्यामुळे असे भिशी चालक रस्त्यावर आले.
....

सावध भिशी चालक
बऱ्याचदा कर्ज घेऊन कायद्याचा धाक दाखवत अशी कर्जे बुडवण्याचे प्रकार सुरू आहेत. यात भिशी चालक रसातळाला जातो. यामुळे सावध झालेले भिशीचालक आता सभासदांना कर्ज देताना भिशीतीलच दोघांना जामीनदार म्हणून सह्या घेत उसनवार पावत्या आणि धनादेश घेण्याकडे कल वाढला आहे.