केळी काढणीचा हंगाम लांबला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळी काढणीचा हंगाम लांबला
केळी काढणीचा हंगाम लांबला

केळी काढणीचा हंगाम लांबला

sakal_logo
By

04149
---------------
केळी काढणीचा हंगाम लांबला
अतिवृष्टीचा परिणाम; मुळे कुजली, करप्याचाही प्रादूर्भाव
गणेश शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २१ : अतिवृष्टीचा फटका केळीलाही बसला आहे. दिवाळीत केळी उत्पादक शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग जमले आहेत. शेतात पाणी साचून राहिल्याने झाडांची मुळे कुजू लागल्याने याचा परिणाम घडांवर झाला आहे. सरासरी ३० ते ३५ किलोचा घड १५ ते १८ किलोवर आला आहे. शिवाय पहिले पीक घेण्यास आणखीन तीन महिने लागणार आहेत.
परतीच्या पावसाने पिकांचा अक्षरशः चिखल केला आहे. यातून केळी पीकही वाचले नाही. सरींमध्ये पाणी साचून राहिल्याने मुळे कमकुवत होऊन कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागत असून सततच्या पावसाने औषधेही पाण्याबरोबर वाहून जात आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अतिपावसामुळे केळी पिकाची वाढ खुंटली आहे. यावर्षी उत्पन्नात मोठी घट होणार असल्याने घातलेल्या खर्च तरी निघावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
बारा महिन्याचे हे पीक तीन महिने पुढे गेले आहे. वास्तविक सध्या केळी घड काढणीचे दिवस असून अतिवृष्टीमुळे घडांची वाढ होत नसल्याने किमान शंभर दिवस तरी कापणी पुढे गेली आहे. सध्या सणाचे दिवस असून केळीची कापणी झाली असती तर शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची संधी होती. मात्र काढणी आणखी तीन महिने पुढे गेल्याने याचा दरावर परिणाम होणार आहे.
केळीची लागण केल्यापासून सात ते नऊ महिन्यात घड पडण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र आज बारा महिने होऊनही घड काढण्याचा पत्ता नाही. सरींमधील पाणी हटत नसल्याने मुळे कुजण्याची प्रक्रिया सुरू असून यामुळे झाडे झुकत आहेत. औषधांवरील खर्चही वाया जात असल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
....

ऊसाला पर्याय
ऊस पिकाला पर्याय म्हणून शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. काही दिवसांपासून महापुरामुळे केळीच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. यावर्षी महापुराने शेतकऱ्यांना साथ दिली असली तरी अतिवृष्टीने मात्र शेतकऱ्यांचा घात केला आहे.
....
करप्याचेही संकट
अतिवृष्टीमुळे मुळे कुजण्याची प्रक्रिया सुरू असून याचा केळी उत्पादनावर परिणाम होत असतानाच करपा रोगाचीही फैलाव सुरू झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. औषध फवारणी करूनही पावसामुळे याचा परिणाम पिकावर होताना दिसत नाही. मूळ कुजणे आणि करपा यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
....

जी-९ जातीच्या केळीची अडीच एकरात लागवड केली आहे. एकरी एक ते सव्वा लाख रुपये उत्पादन खर्च आला आहे. सध्या केळी घड काढणीचा कालावधी असला तरी अतिवृष्टीमुळे केळी झाडांची मुळे कुजत असून याचा घडावर परिणाम झाला आहे. घडांची वाढ खुंटल्याने आणखीन तीन महिने तरी केळी घड काढणीचा हंगाम पुढे गेला आहे. यातून केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

-संजय रजपूत,
केळी उत्पादक शेतकरी, जयसिंगपूर)