ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या घटल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या घटल्या
ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या घटल्या

ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या घटल्या

sakal_logo
By

ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या घटल्या
यांत्रिकीकरण, पालनपोषणाचा वाढता खर्च, लम्पी प्रादुर्भावाचा परिणाम
जयसिंगपूर, ता. ११ : यांत्रिकीकरण, पालनपोषणाचा वाढता खर्च आणि लम्पीच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातून बैलगाड्या दिसेनाशा झाल्या आहेत. सध्या साखर कारखान्याच्या गाळप हंगामातही या वर्षी बैलगाड्यांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. वाहनांच्या वापरावरच भर दिला जात आहे. यंदा राज्यात ऊस वाहतुकीसाठी कारखान्याकडे येणाऱ्या बैलगाड्यांची संख्या खूपच कमी झाली आहे.
लम्पीमुळे मजुरांना उपलब्ध न झालेल्या बैलजोड्या व बैलजोड्यांना जोपासण्यासाठी आवाक्याबाहेर गेलेला खर्च यामुळे यंदा बैलगाड्यांच्या संख्येत झपाट्याने घट झाली. बैलगाड्याची जागा आता ट्रॅक्टर बैलगाडी म्हणजेच अंगदने घेतली आहे. कारखान्याचे गळीत हंगाम सुरु होताच ऊसपट्यातील प्रत्येक गावांच्या वेशीवर पहाटे बैलगाड्यांची वर्दळ, बैलांच्या दुडकी चालीने होणारा घुंगरांचा आवाज, शिवारांना जागे करत उसाच्या फडात ऊस भरणीसाठी जातो. कारखान्यांना दहा किलोमीटरच्या आतील ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या म्हणजे हक्काचे वाहन. पण ऊस हंगाम सुरू होण्याआधी दोन महिने अगोदर राज्यभर लम्पीचा प्रादुर्भाव झाला. बहुतांश जनावर बाजार बंद राहिले. याचा फटका बैल खरेदी करणाऱ्या मजुरांनाही बसला. बैल उपलब्ध न झाल्याने बैलगाड्यांची संख्याही कमी झाली. पर्यायाने बैलाऐवजी छोटे ट्रॅक्टर घेऊन त्याला ट्रेलरऐवजी बैलगाडीला असणारी टायरीची गाडी जोडून ट्रॅक्टर गाडीची संकल्पना राबवली. दोन वर्षांपासून अशा प्रकारच्या गाड्यात थोडी थोडी वाढ होती. यंदा मात्र ऊस वाहतुकीत बैलगाड्यांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे.
....

बैलगाड्या नामशेष होण्याचा धोका
पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात दरवर्षी बैल गाड्या असतात. एकेका कारखान्याकडे सरासरी ४०० ते ५०० बैलगाड्या ऊस वाहतुकीसाठी येतात. यंदा मात्र ही संख्या २०० ते ३०० बैलगाड्यावर आली. यामुळे यंदा बैलगाड्याद्वारे होणारी वाहतूक खूपच कमी प्रमाणात होणार असल्याचे चित्र आहे.
....

टांगादेखील गायब
वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी वाहनांची संख्या कमी होती या काळात घोड्यांच्या टांग्यांनी प्रवासी वाहतूक केली जात होती. कालांतराने चांगले रस्ते झाले. दळणवळणाची साधने निर्माण झाली. यामुळे सर्वत्र दिसणारा टांगा गायब झाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती बैलगाड्यांवर येऊन ठेपले आहे.