उदगावात मनोरुग्णालयास तत्त्वतः मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदगावात मनोरुग्णालयास तत्त्वतः मान्यता
उदगावात मनोरुग्णालयास तत्त्वतः मान्यता

उदगावात मनोरुग्णालयास तत्त्वतः मान्यता

sakal_logo
By

उदगावात मनोरुग्णालयास तत्त्वतः मान्यता

राजेंद्र पाटील-यड्रावकर; आरोग्यमंत्री सावंत यांच्या दालनात बैठक

जयसिंगपूर, ता. १६ : उदगाव (ता. शिरोळ) येथे शासकीय मनोरुग्णालय उभारण्यास तत्त्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. तसेच दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीस भरीव निधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उदगाव येथे सुमारे ११८ कोटी रुपये खर्चाचे शासकीय मनोरुग्णालय उभे राहावे, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. बुधवारी (ता. १६) आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मंत्रालयातील दालनात आरोग्य विभागाकडील अन्य विषयांवर बैठकीचे आयोजन केले. मंत्री सावंत यांनी बैठकीत उदगाव येथे मनोरुग्णालय उभारण्यास तत्त्वतः मान्यता दिली. तातडीने रुग्णालयाचा हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवून त्यास मंजुरी दिली जाईल व पुरवणी बजेटमध्ये या रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधीची तरतूद केली जाईल, असे सांगितले. सध्या पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये शासकीय मनोरुग्णालय नाही.
कोकणात रत्नागिरी येथे शासकीय मनोरुग्णालय आहे. मात्र ते रत्नागिरी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग केले आहे. तसेच सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमधील रुग्णांची गैरसोय होत होती. आपण आरोग्य राज्यमंत्री असताना कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये शासकीय मनोरुग्णालय व्हावे, यासाठी सातत्याने आग्रही होतो. उदगाव येथील शासकीय जमिनीवर जवळपास ११८ कोटी रुपये खर्चाचे मनोरुग्णालय उभारण्यासाठीचा प्रस्तावही आपण सादर केला होता. प्रस्तावाबाबत आरोग्यमंत्री सावंत यांच्यासमवेत सविस्तर चर्चा झाली. त्यांनी बैठकीत शासकीय मनोरुग्णालय उभारण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिल्याचे यड्रावकर यांनी सांगितले.
बैठकीस आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, सहसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, डॉ. विजय कंदेलवार, कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक हुबेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे आदी उपस्थित होते.
---------------
दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी निधी
दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत जुनी असल्याने येथे रुग्णांची गैरसोय होत होती. रुग्णालयाशेजारील रिकाम्या जागेत दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत व्हावी आणि यासाठी वीस कोटींचा निधी मंजूर व्हावा, अशीही मागणी केली होती. बैठकीत चर्चा होऊन आरोग्यमंत्री सावंत यांनी दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारत उभारणीसाठी निधी देण्याबाबत सकारात्मकता दर्शवल्याचे यड्रावकर यांनी सांगितले.