शाळा स्थलांतर प्रमाणपत्राविनाही प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राविनाही प्रवेश
शाळा स्थलांतर प्रमाणपत्राविनाही प्रवेश

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राविनाही प्रवेश

sakal_logo
By

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राविनाही प्रवेश
---
मेघन देसाई यांची माहिती; विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित न होण्यासाठी निर्णय
जयसिंगपूर, ता. ७ : शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी शासन निर्णय जारी झाला आहे. जयसिंगपूर नगरपालिका शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख मेघन देसाई यांनी ही माहिती दिली.
कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत पहिली ते दहावीत प्रवेशासाठी अन्य शाळांतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल, त्याला आता सुलभरीतीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) त्यांना प्रवेश नाकारण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गात प्रवेश देण्यात येईल, असे नमूद असून अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा, अशी तरतूद आहे. त्यानुसार जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश द्यावा असे निर्णयात म्हटले आहे. या शासन निर्णयानुसार नगरपालिका, खासगी अनुदानित, कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या तसेच कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न असलेल्या शाळेत अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल त्याला शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी प्रवेश नाकारता येणार नाही.
विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, तसेच शिक्षण खंडित होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये याची दक्षता संबंधित शाळाप्रमुख, मुख्याध्यापकांनी घ्यावयाची आहे. विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश घेतल्यास अशी नवीन शाळा विद्यार्थ्याची सरल पोर्टलवरील माहिती मिळविण्याची विनंती जुन्या शाळेकडे करेल आणि जुनी शाळा सात दिवसांच्या आत विनंती मान्य करेल. शाळेने अशी विनंती मान्य न केल्यास संबंधित केंद्रप्रमुख अशी विनंती त्यांच्या स्तरावरून मान्य करतील, असेही या शासन निर्णयात स्पष्ट केल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.