
धरणातून पाणी सोडल्याने नद्या प्रवाहित होणार ः यड्रावकर
धरणातून पाणी सोडल्याने
नद्या प्रवाहित होणार ः यड्रावकर
जयसिंगपूर, ता.२: राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक तर कोयना धरणातून बाराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे लवकरच शिरोळ तालुक्यामधून वाहणाऱ्या कृष्णा, पंचगंगा व वारणा नदी पात्रातील पाणी प्रवाहित होईल अशी माहिती, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.
ते म्हणाले, ‘सध्या या तिन्ही नद्यांमध्ये काही ठिकाणी पात्र कोरडे दिसते. शेती, उद्योग व्यवसायासाठी व पिण्याच्या पाणी योजनांसाठी होणाऱ्या उपशावर नदीपात्र कोरडे राहू लागल्यामुळे याचा विपरीत परिणाम होत आहे. याचाच भाग म्हणून आपण पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती निदर्शनास आणली. यानंतर पाटबंधारे विभागाने तातडीने हालचाली करत कोयना, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच कृष्णा, पंचगंगा, वारणा या नद्यांची पात्रे प्रवाहित होतील. राधानगरी धरणामधून होणाऱ्या विसर्गामुळे गुरुवारी सकाळपर्यंत तेरवाड बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचले. लवकरच ते पुढे शिरोळ बंधाऱ्यापर्यंत पोहोचेल. कोयनेतून सुरू झालेला विसर्ग टेंभू ताकारीमार्गे प्रवाहीत होणार असल्यामुळे कृष्णा नदीपात्रात हे पाणी पोहोचण्यासाठी आणखी दोन दिवसाचा कालावधी लागेल. कोल्हापूर बंधाऱ्याचे काम सुरू असल्यामुळे वारणा नदीवरील चांदोली धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग सुरू केला नाही. एक-दोन दिवसात कोल्हापूर बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. चांदोली धरणामधूनसुद्धा विसर्ग केला जाईल. त्यामुळे वारणा नदी प्रवाहित होईल.’