
मासे मृत्युमुखी
5032
उदगाव (ता. शिरोळ) : दूषित पाण्यामुळे शुक्रवारी कृष्णेत मृत माशांचा खच पडला होता. नागरिकांचीही मासे नेण्यासाठी झुंबड उडाली होती. (छायाचित्रे : अजित चौगुले, उदगाव)
05030
उदगाव ः दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी पडलेला २३ किलोचा तांबर जातीचा मासा.
प्रदूषित कृष्णा नदीत
हजारो मासे मृत्युमुखी
---
उदगावात मासे नेण्यासाठी झुंबड
जयसिंगपूर, ता. १० : पंचगंगेपाठोपाठ आता कृष्णेतही दूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच पडू लागला आहे. दूषित पाण्यामुळे आज मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले. मृत मासे नेण्यासाठी नदीकाठावर दिवसभर अक्षरशः झुंबड होती. काठावर दुपारपर्यंत तडफडणारे मासे पाहून अनेक जण हळहळले.
आठवड्यापासून कृष्णेच्या पाण्याची पातळी खालावली होती. आज पहाटे कृष्णेत कोयनेतून सोडलेले पाणी दाखल होत असतानाच नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याने उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा पात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडले. आज परिसरातील नागरिकांनी मासे गोळा करण्यासाठी प्रचंड गर्दी केली.
कृष्णेची शिरोळ तालुक्यात आठ दिवसांपासून पाण्याची पातळी घटली होती. त्यामुळे अनेक गावांचा व शेतीचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, कोयना धरणातून पाणी सोडल्यावर आज पहाटे पात्रात पाणी येत होते. अशा मुदतीत सांगली परिसरात रासायनिकयुक्त सांडपाणी पात्रात सोडल्याने आज सकाळी दहापासून हजारो मासे पाण्यावर तडफडत असल्याचे दिसून आले.
उदगाव, जयसिंगपूर, अंकली परिसरातील नागरिकांनी मासे गोळा करण्यासाठी नदीपात्रात प्रचंड गर्दी केली होती. मासे गोळा करीत असताना अगदी लहान माशापासून १२ किलोचा मासाही दूषित पाण्याने मृत्युमुखी पडला. पाण्याला प्रचंड दुर्गंधी आहे. आठ दिवसांपासून कृष्णा पात्रात पाणी नसल्याने चिंचवाडसह अनेक गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. आज नदीत पाणी आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले; मात्र अशातच हे पाणी दूषित असल्याने मासे मृत्युमुखी पडले असल्याने नागरिकांनी पाणी प्यायचे कसे, अशी चिंता भेडसावत आहे. मृत मासे विक्रीसाठी बाजारात नेले जात असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
तब्बल २३ किलोचा मासा
कृष्णा नदीत प्रदूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडल्यावर मासे गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. यात तब्बल २३ किलोचा तांबर जातीचा मासा आढळून आला. गोळा करून नेलेले मासे जवळच्या सांगली, इचलकरंजी आणि कोल्हापूरच्या बाजाराकडे नेण्यात आल्याचे समजते.