
नदी दुषित, कुपनलिकांची पातळी खालावली
नदी दूषित, कूपनलिकांची पातळी खालावली
---
जयसिंगपुरात पाणीटंचाई सुरू; दुहेरी संकटाने नागरिकांचा उन्हाळा असह्य
जयसिंगपूर, ता. १२ ः उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. कूपनलिकांच्या पाण्याची पातळी खालावल्याने शहरातील अनेक अपार्टमेंटना आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवत असताना कृष्णेचेही पाणी दूषित झाल्याने एकीकडे कूपनलिकांना पाणी कमी आहे; तर दुसरीकडे नदीला दूषित पाण्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. उन्हाळा काढायचा कसा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
काही दिवसांपासून शहराला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पाणीटंचाईच्या पहिल्या टप्प्यात शहरातील अनेक अपार्टमेंटला झळा बसू लागल्या आहेत. गरजेनुसार पाण्याचा उपसा होऊन अपार्टमेंटमधील कुटुंबांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत होता. आता मात्र यावर काहीशा मर्यादा आल्या आहेत. एरवी गरजेनुसार होणारा उपसा आता तास-अर्ध्या तासावर आला आहे. परिणामी, अशा अपार्टमेंटना दिवसातून अनेकदा पाण्याचा उपसा करावा लागत आहे.
दुसऱ्या बाजूला दोन दिवसांपासून कृष्णा नदी प्रदूषित बनली आहे. पंधरा दिवस नदीला पाणी नव्हते. शेतीचा पाणी उपसाही अडचणीत येण्याची शक्यता असताना धरणातून पाणी सोडले. मात्र, पाण्याबरोबर रासायनिक पाणी आल्याने मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. अशा स्थितीत हे पाणीही अपायकारक आहे. पाणीटंचाईत यामुळे आणखीनच भर पडली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशी स्थिती असल्याने अख्खा उन्हाळा कसा जाणार, यावरून चिंता व्यक्त केली जात आहे.
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पालिकेवर पाणीपुरवठ्याचा ताण पडत असताना पाणीटंचाईची डोकेदुखी वाढली आहे. आणखी तीन महिने उन्हाळा सोसावा लागणार असताना पाणीपुरवठ्याची अवस्था कशी असणार, याचीच अधिक चिंता आहे.
....
हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली
चार वर्षांआधी उन्हाळा सुरू झाल्यावर अशीच स्थिती निर्माण झाली होती. जवळपास दोन महिने हॉटेलचालकांनी टँकरवरच पाण्याची गरज भागवली. मोठ्या हॉटेलचालकांना दररोज दोन हजार रुपये मोजावे लागले होते. यावर्षीही अशीच काहीशी स्थिती असल्याने हॉटेलचालकांची चिंता वाढली आहे.
....
पाणी उकळून पिण्याचे आवाहन
कृष्णा नदी प्रदूषणामुळे मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे पाण्याला दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.