टुडे पान एक

टुडे पान एक

१४० वापरात; ६४ नादुरुस्त
जयसिंगपुरात कूपनलिकांची स्थिती; पालिका फंडातून दुरुस्तीची गरज

गणेश शिंदे; सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता.३०: शहरातील २०४ पैकी तब्बल ६४ कूपनलिका बंद आहेत. उन्हाचा तडाखा वाढत असताना या कूपनलिका दुरुस्त करण्याची गरज आहे. यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद अपेक्षित आहे. प्रशासनाने पालिका फंडातून रकमेची तरतूद करत बंद अवस्थेतील कूपनलिका सुरू करून व्यावसायिक आणि नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.
पाच वर्षांपूर्वी माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्ताने स्वखर्चाने शहरात बहुतांश ठिकाणी कूपनलिकांची खोदाई केली आहे. असे असताना पालिका प्रशासनाने किमान देखभाल दुरुस्तीचा खर्च करणे अपेक्षित आहे. यावर्षी उन्हाचा कडाका वाढत आहे. कृष्णा नदी पात्रात पाण्याची पातळी खालावली आहे. अशा स्थितीत शहराच्या विविध भागात असणाऱ्या कूपनलिकांच्या माध्यमातून पाण्याची गरज भागणार आहे. मात्र शहरातील ६४ कूपनलिका असून अडचण आणि नसून खोळंबा बनल्या आहेत.
सध्या वाढणाऱ्या उन्हात गारवा निर्माण करण्यासाठी शहरातील लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून दुकानांपुढे पाण्याचा वापर केला जात आहे. कूपनलिका बंद असल्याने पिण्यासाठी असणाऱ्या पाण्याचा यासाठी वापर होत आहे. पालिका प्रशासनाने शहरातील बंद अवस्थेत असणाऱ्या कूपनलिकांची दुरुस्ती करून व्यावसायिकांना पाण्याची सोय करावी अशी मागणी होत आहे. शहरातील बंद कूपनलिका सुरू केल्यास नदीच्या पाण्याचा वापर काही प्रमाणात कमी होणार आहे. कृष्णा नदी पात्रात पाण्याची घटती पातळी लक्षात घेता कुपनलिका सुरू करणे पालिकेच्या हिताचे ठरणार आहे.

....

तक्रार केली तरच दुरुस्ती
शहरात अनेक ठिकाणी कूपनलिका नादुरुस्त आहेत. नादुरुस्त कूपनलिकांची पालिकेकडे तक्रार केली तरच सोयीनुसार त्यांची दुरुस्ती केली जाते. त्यामुळे बंद कूपनलिकांची व्यावसायिक आणि नागरिकांनी पालिकेकडे तक्रार करण्याची गरज आहे.
....

देखभाल दुरुस्ती तरी करा
माजी नगरसेवकांनी स्वखर्चाने नागरिकांसाठी कूपनलिका खोदल्या. मात्र त्याची देखभाल दुरुस्ती पालिका प्रशासनाने करणे अपेक्षित आहे. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने बंद कूपनलिका दुरुस्त कराव्यात. यासाठी दरवर्षी ठराविक निधीची तरतूद करण्याची गरज आहे.
....
कोट
शहरातील बंद कुपनलिका दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पालिका फंडातून यासाठीची तरतूद केली जाणार आहे. तत्पूर्वी यासाठी परवानगीची प्रक्रिया सुरू आहे.
- जमीर मुश्रीफ, उपअभियंता (यांत्रिकी) पाणीपुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com