उदगाव सरपंचासह नऊ सदस्य अपात्र

उदगाव सरपंचासह नऊ सदस्य अपात्र

उदगाव सरपंचासह नऊ सदस्य अपात्र

जयसिंगपूर, ता.२२: उदगाव (ता. शिरोळ) येथील सरपंचांसह नऊ सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.२२) अपात्र ठरवले. यड्रावकर गट, काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या सरपंच कलिमुन बाळासो नदाफ यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला, तर सरपंचांवर मनमानीचा आरोप करत राजीनामे दिलेल्या स्वाभिमानीच्या उपसरपंचांसह नऊ सदस्यांनी राजीनामे दिले होते. त्यांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविल्याने उदगावात खळबळ उडाली आहे.
उदगांवच्या सरपंच कलिमुन नदाफ यांच्यावर भ्रष्टाचार व मनमानी कारभाराचा आरोप करीत स्वाभिमानीच्या उपसरपंचांसह नऊ सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर या सदस्यांनी या राजीनाम्यावर हरकती घेतल्या होत्या. या मुदतीत स्वाभिमानीच्या नऊ सदस्यांबरोबर यड्रावकर गट, काँग्रेस व शिवसेनेच्या आघाडीतील ५ अशा एकूण १४ सदस्यांनी सरपंच नदाफ यांच्यावर २४ मार्च २०२३ रोजी विशेष सभा घेऊन अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्यानंतर सरपंच नदाफ यांनी स्वाभिमानीच्या नऊ सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यां‍च्या न्यायालयात धाव घेतली होती.
सरपंचांवरील अविश्वास ठराव व नऊ सदस्यांचा राजीनामा या प्रकरणी सहा महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यां‍च्या न्यायालयात दावा सुरू होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यां‍नी सरपंच कलिमुन नदाफ यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव कायदेशीररित्या बरोबर असल्याने याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सरपंच नदाफ यांचे सरपंचपद अपात्र ठरले व सदस्यपद मात्र वाचले आहे.
तर स्वाभिमानीचे उपसरपंच सौरभ राजगोंडा पाटील, सदस्य हिदायत अहमद नदाफ, मेघराज श्रीकांत वरेकर, रमेश कुबेर मगदूम, जगन्नाथ आण्णाप्पा पुजारी, सुनिता आदिनाथ चौगुले, पुजा सुनील जाधव, ज्योत्स्ना सुभाष गदगडे, भारती सुरेश मगदूम असे नऊ जण अपात्र झाल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यां‍नी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com